मुंबई - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. सैफवर चाकू हल्ला करणारा आरोपी बांगलादेशातील रहिवासी असून ७ महिन्यापूर्वी त्याने बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केली. मुंबईत येण्यापूर्वी त्याने सिम खरेदीसाठी पश्चिम बंगालचा रहिवासी असलेलं आधार कार्ड वापरले. रविवारी पोलिसांनी ठाणे शहरातून आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला याला अटक केली. शरीफुलनं त्याचं नाव बदलून विजय दास ठेवले होते आणि ७ महिन्यापूर्वी त्याने भारतात प्रवेश करण्यासाठी दावकी नदी पार केली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी काही दिवसांपर्यंत पश्चिम बंगालमध्ये थांबला आणि तिथे स्थानिक नागरिकाच्या आधार कार्डच्या मदतीने सिम खरेदी केले. त्यानंतर जॉबच्या शोधासाठी तो मुंबईत आला होता. आरोपीने वापरलेले सिमकार्ड पश्चिम बंगालमधील खुकुमोनी जहांगीर सेखा या नावावर रजिस्टर आहे. शरीफुलने त्याचं आधार कार्ड बनवण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते मिळालं नाही. मुंबईत आरोपीने अशाठिकाणी काम करणं शोधले जिथे त्याला कागदपत्राची गरज लागली नाही. कामगार ठेकेदार अमित पांडेने त्याला वरळी आणि ठाण्यातील पब आणि हॉटेलमध्ये हाऊसकिपिंगचं काम देण्यासाठी मदत केली.
शरीफुलचा मोबाईल तपासल्यावर त्याने बांगलादेशला अनेक कॉल केले होते आणि शेजारच्या देशात असलेल्या त्याच्या कुटुंबाला कॉल करण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर केला होता हे पोलिसांना आढळले. १६ जानेवारी रोजी आरोपीने सैफ अली खान याच्यावर त्याच्या इमारतीतील अपार्टमेंटमध्ये चाकूने वार केले, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेले. त्यानंतर आरोपीला एक बॅग घालायला लावली जसं त्याने घटनेवेळी घातली होती. त्यानंतर क्राइम सीन रिक्रिएट करण्यात आला. फॉरेन्सिक टीमसह पोलिसांच्या पथकांनी सैफच्या घरातील बाथरूमची खिडकी, पायऱ्या आणि अन्य ठिकाणाहून १९ फिंगरप्रिंट जप्त केले. आरोपी बाथरूममधून सैफच्या घरात घुसला होता. हल्ल्यानंतर तो तिथूनच बाहेर पडला. हल्ल्यानंतर तो वांद्रे येथील बस स्टॉपवर ७ वाजेपर्यंत झोपला. तिथून कपडे बदलून सैलूनमध्ये जात हेअर कट केला. एका दुकानातून हेडफोड घेत वरळी कोळीवाड्याला पोहचला. मीडियातील बातमी आणि सीसीटीव्ही फुटेजमधील त्याचा चेहरा पाहून तो घाबरला आणि ठाण्याला पळाला.
ठाण्याला जाताना एका सीसीटीव्हीत आरोपी कैद झाला. त्यात अंडापाव खाल्ल्यानंतर त्याने ऑनलाईन पेमेंट केले. पोलिसांनी जेव्हा अंडापाव दुकानात चौकशी केली तेव्हा आरोपी वरळीतील एका रेस्टॉरंटमध्ये हाऊसकिपिंगचं काम करायचा हे कळलं. त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये चौकशी केली असता तिथे एका चोरीमुळे हॉटेल स्टाफ बदलल्याचं सांगितले. त्यानंतर मालकाने कामगार पुरवणाऱ्या ठेकेदाराचा नंबर दिला. त्या ठेकेदाराने आरोपीचा मोबाईल नंबर दिला जो ऑनलाईन पेमेंटशी जुळला. त्यानंतर लोकेशन ट्रेस करत पोलिसांनी त्याला अटक केली.