Sagar Karande Cyber Fraud: देशासह राज्यभरात सायबर फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य नागरिकांप्रमाणे मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींना सुद्धा याचा सामना करावा लागत आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या सागर कारंडे अशाच एका स्कॅमला बळी पडला. टास्क फ्रॉडच्या जाळ्यात अडकून सागर कारंडेची ६१ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणात सायबर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सागरला सायबर ठगांनी व्हॉट्सअॅप संदेश पाठवत इन्स्टाग्रामवरील पोस्ट लाइक करण्यासाठी दीडशे रुपये देण्याचे आमिष दाखवून जाळ्यात अडकवले आणि ६१ लाख ८३ हजार रुपये उकळले. सागर कारंडेची फसवणूक करणाऱ्या आरोपीचं नाव अक्षयकुमार गोपाइनकुमार असं आहे. माहितीनुसार, सायबर सेलने आरोपीला ठाणे येथून अटक केली आहे.
दरम्यान, जेव्हा हे प्रकरण समोर आलं होतं, तेव्हा मात्र, सागर कारंडेनं झी २४ तास या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना 'तो मी नव्हेच' असं म्हटलं होतं. "हे सगळं फेक आहे. सागर कारंडे नावाचा एकच माणूस नाहीये. खूप आहेत. सर्च केलं तर खूप दिसतील तुम्हाला. माध्यमांमध्ये जे येतंय, ते त्यांचं काम आहे, ते त्यांना करु देना. आपल्याला काय करायचं आहे" अशी प्रतिक्रिया त्यानं दिलं होतं.
सागर कारंडेला २३ फेब्रुवारी २०२५ रोजी एका अनोळखी नंबर वरून मेसेज आला. ज्यात एका अनोळखी महिलेने इंस्टाग्राम पोस्ट लाईक केल्यावर १५० रुपये मिळतील असे सांगितले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी कारंडे यांच्या खात्यात काही पैसे देखील पाठवले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे उकळून अभिनेत्याची फसवणूक झाली, असं एफआयआरमध्ये नमूद आहे. पुढे मात्र हे काम सुरू ठेवण्यासाठी पैसे गुंतवावे लागतील. ते पैसे कुठेही वापरले जाणार नाहीत, असं त्याला सांगण्यात आलं होतं. यावर विश्वास ठेवून सागरने सुरुवातीला २७ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.
सागरने काही दिवसांनंतर वॉलेटमधील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वॉलेटमधील पैसे काढू नये, टास्क पूर्ण झाल्यावर ते मिळतील, असं सांगितलं. त्याबरोबरच १०० टक्के टास्क पूर्ण करण्यासाठी आणखी काही रक्कम भरावी लागेल, असं म्हणत सागरला सायबर गुन्हेगारांनी आणखी १९ लाख रुपये आणि त्यावर ३०टक्के कर भरण्यास भाग पडलं. अशा प्रकारे त्याच्याकडून ६१ लाख ८३ हजाररुपये उकळण्यात आले. पैसे मिळत नसल्याने आपल्याला फसवलं गेल्याचं सागर कारंडेच्या लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांत धाव घेतली. सागरनं हेल्पलाइन नंबरवर कॉल करत ५ मार्च २०२५ रोजी सायबर पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार केली. त्यानंतर कारंडेकडून ३१ मार्च २०१४ रोजी याप्रकरणी कांदिवली येथे प्रत्यक्ष जाऊन रीतसर तक्रार देण्यात आली.