Join us
Daily Top 2Weekly Top 5

असं का ? हा प्रश्न मलाही पडलाय ; सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 13:17 IST

सचिन पिळगावकर : मराठी सिनेमांमध्येसुद्धा मी मुस्लिम भूमिका साकारत असेल तर मग हिंदीत का नाही?

ठळक मुद्देगेल्या काही वर्षांत  मला अनेक ऑफर आल्या पण मी त्यांना नकार दिला. मला एकाच प्रकारच्या भूमिका करायच्या नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयानं अढळ स्थान निर्माण करणारे तसेच नाटकातूनच नाही तर निर्मिती क्षेत्रातूनही सगळ्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतीलही स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली. आता तर ओटीटीवरही त्यांची चर्चा आहे. पण ओटीटी काम करतानाच एक खंत मात्र त्यांना आहेच. होय, ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी कलाकारांना फक्त मराठी भूमिकांसाठीच विचारणा होते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

‘सिटी ऑफ ड्रिम्स सिझन 2’ या वेब सिरीजच्या निमित्ताने सचिन पिळगावकर पुन्हा एकदा गुरव ही राजकारण्याची व्यक्तिरेखा साकारतायत.  याच सिरीजच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने सचिन यांच्यासोबत संवाद साधला आहे.  ओटीटी प्लॅटफॉर्म काम करण्याची इच्छा असतानाही हव्या तश्या भूमिका मिळत नसल्याची खंत सचिन यांनी यावेळी व्यक्त केली आहे.ओटीटीवरच्या हिंदी वेबसीरिजमध्ये मराठी कलाकारांना फक्त मराठी भूमिकाच का ऑफर  केल्या जातात, हा मलाही पडलेला प्रश्न आहे, असे ते म्हणाले.

‘ हिंदी वेबसीरिजमध्ये एखादी मराठी भूूमिका असेल तरच निर्माता-दिग्दर्शकांना मराठी कलाकारांची आठवण येते. असं का ? असा प्रश्न मला अनेकदा पडतो. हे फक्त मी माझ्या बाबतीत बोलत नाहीये. पण वेगळ्या भूमिकेसाठी मराठी कलाकाराचा विचार का केला जात नाही, हे इथलं वास्तव आहे. मराठीत मात्र असा विचार केला जात नाही. कारण कलाकार हा कलाकार असतो. त्यामुळे फक्त मराठी भूमिकांसाठीच मराठी कलाकार हवेत असा विचार ओटीटी प्लॅटफॉर्मवरील निर्मात्यांनी करू नये, असं सचिन म्हणाले. ‘मी स्वत: एक मराठी कलाकार आहे. पण मी मराठीपेक्षा जास्त काम हिंदीमध्ये केलं आहे.  मराठी चित्रपटामध्ये मी मुस्लिम भूमिका साकारत असेन तर मग हिंदीत का नाही? मी मराठी चित्रपटांपासून सुरुवात केली. कारण मराठी माझी मातृभाषा आहे. मला तिचा अभिमान आहे. पण भारतातील इतर ठिकाणी लोक मला फक्त सचिन म्हणून ओळखतात. त्यामुळे मी फक्त एक मराठी कलाकार आहे, असं लोक म्हणत असतील तर ते चूक आहे,’ असंही ते म्हणाले.गेल्या काही वर्षांत  मला अनेक ऑफर आल्या पण मी त्यांना नकार दिला. मला एकाच प्रकारच्या भूमिका करायच्या नाहीत, असंही त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :सचिन पिळगांवकर