Join us
Daily Top 2Weekly Top 5

"स्त्री-पुरुष समान आहेत असं मी मानत नाही", सचिन पिळगावकरांचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 14:20 IST

सचिन पिळगावकर त्यांच्या व्यक्तिमत्वासाठीही ओळखले जातात. आपलं मत ते अगदी परखडपणे मांडताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य केलं आहे.

सचिन पिळगावकर हे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. मराठीसोबतच त्यांनी बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. अभिनयाने त्यांनी एक काळ गाजवला. एक अभिनेता असण्याबरोबरच ते उत्तम दिग्दर्शकही आहेत. अनेक सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. सचिन पिळगावकर त्यांच्या व्यक्तिमत्वासाठीही ओळखले जातात. आपलं मत ते अगदी परखडपणे मांडताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य केलं आहे.

सचिन पिळगावकरांनी नुकतीच 'मिरची मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, "लोक म्हणतात की स्त्री-पुरुष समान आहेत. त्यांना तुम्ही समान वागवलं पाहिजे. स्त्रियांना तुम्ही खालच्या दर्जाला ठेवता आणि पुरुषांना वरच्या दर्जाला ठेवता, तर तसं नाहीये. स्त्री आणि पुरुष हे समान आहेत, असं काही जण म्हणतात. पण, मी हे मानत नाही. कारण, स्त्री ही सर्वाथाने पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. स्त्रीचं स्थान हे वर आहे आणि पुरुषाचं त्याच्या खाली. हे मानलं पाहिजे. हे परमेश्वराने सिद्ध केलं आहे. कारण, आई बनण्याचं सौभाग्य हे त्याने फक्त स्त्रीला दिलेलं आहे. पुरुषाला दिलेलं नाही. यातूनच हे सिद्ध होतं की स्त्री ही श्रेष्ठ आहे". 

"पुरुषाला हे माहीत नव्हतं अशातला भाग नाही. पुरुषाला पहिल्यापासूनच हे सगळं माहीत होतं. त्याला कळलं होतं की ही आपल्यापेक्षा पॉवरफूल आहे. त्यामुळे त्याने तिला घरी बसवलं. मुलं सांभाळा, जेवण करा, घरातली साफसफाई करा. बाकीचं बाहेरचं काम मी करतो. बाहेर दुनियेत तो जाणार, हिने घराच्या बाहेर पडायचं नाही. कारण, घराच्या बाहेर पडली की तिला एक्सपोजर मिळणार. आणि ते मिळालं की तिला शिकता येणार. आणि त्यामुळे ती आपल्यावर हावी होणार. कारण, ती जास्त शक्तिशाली आहे. त्यामुळे या प्रथा अशाप्रकारे सुरू झाल्या. मुलींनी शिकून करायचं काय? शेवटी लग्नच तर करायचं आहे. पोरंबाळ सांभाळायची आहेत. हेच काम आहे बाईचं दुसरं काय काम आहे? स्त्रियांना असं वागवताना लाज नाही वाटत का? मी याच्या विरुद्ध आहे", असं सचिन पिळगावकर म्हणाले.  

टॅग्स :सचिन पिळगांवकरमराठी अभिनेतासेलिब्रिटी