Join us  

'मला अचानक रिप्लेस केलं..'; गाजलेल्या मालिकेतून ऋतुजा बागवेला दाखवला बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 6:55 PM

Rutuja bagwe: मला नायिका होण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला, असंही ऋतुजाने या मुलाखतीमध्ये सांगितलं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे (rutuja bagwe). गेल्या काही दिवसांपासून ऋतुजा सातत्याने चर्चेत येत आहे. आतापर्यंत तिने तिच्या करिअरविषयी आणि इंडस्ट्रीत तिला मिळालेल्या वागणुकीविषयी बऱ्याचदा उघडपणे भाष्य केलं आहे. यामध्येच तिने 'ह्या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून तिला अचानकपणे रिप्लेस केल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री कशा प्रकारची असावी हे सुद्धा तिने यावेळी सांगितलं.

अलिकडेच ऋतुजाने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. "अभिनय क्षेत्रात आल्यानंतर मला नायिका होण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. कारण, मी उत्तम अभिनय करते हे सगळ्यांनाच ठावूक आहे. आपल्या भूमिका कमी-जास्त सुद्धा होतात. पण, तू वाईट काम करतेस असं अजून तरी मला कोणी सांगितलेलं नाही. आणि, हीच आपल्या कामाची पोचपावती आहे. या उलट नायिका म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मला असंख्य ऑडिशन्स द्यावे लागले. खूपदा रिजेक्टही झाले. पण, मी कधीच हरले नाही. कारण, एकांकिका स्पर्धेचा गाभा माझ्या पाठिशी होता", असं ऋतुजा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "२००७ साली मला ह्या गोजिरवाण्या घरात ही पहिली मालिका मिळाली. पण, या मालिकेतून मला अचानक रिप्लेस करण्यात आलं होतं. त्यानंतर मी पुन्हा नाटकांकडे वळले. वयाच्या २७ व्या वर्षी मला नायिका म्हणून पहिलं काम मिळालं. तोपर्यंत मी सगळ्या मालिकांमध्ये कॅमिओ, छोट्या-मोठ्या भूमिका, वयापेक्षा मोठ्या भूमिका करत होते. २००७ नंतर थेट २०१५ मध्ये मला नायिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ही आठ वर्षे मला स्वत:ला सिद्ध करावं लागलं. पण, या काळात 'अभिनय काय १० किंवा शंभर एपिसोड्सनंतर कोणीही करेल पण, नायिकेकडे बघताना छान वाटलं पाहिजे'. ही वाक्य मी ऐकली आहेत. "

दरम्यान, ऋतुजाने नांदा सौख्यभरे, तू माझा सांगाती, चंद्र आहे साक्षीला यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच अलिकडेच तिचा लंडन मिसळ, सोंग्या हे दोन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आले.

टॅग्स :ऋतुजा बागवेटेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमा