Join us  

वडील गेले अन् दहिसरला..; रोहितच्या कुटुंबाची झाली होती वाताहत, कठीण काळावर केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 1:56 PM

Rohit shetty: रोहितने हर्ष-भारतीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंबईचं कौतुकही केलं आहे.

अॅक्शनपटांसाठी खासकरुन ओळखला जाणारा लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी (rohit shetty). आजवरच्या कारकिर्दीत रोहित शेट्टीचे असंख्य सिनेमा सुपरहिट झाले आहेत. या गोलमाल आणि सिंघम फ्रँचायझी या सिनेमांचा तर आवर्जुन उल्लेख केला जातो. इतकंच नाही तर बॉलिवूडमधला सर्वात महागडा दिग्दर्शक म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. मात्र, त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. खऱ्या आयुष्यात त्याने अनेक कष्ट उपसले असून वडिलांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाची वाताहत झाली होती.रोहित आज त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये त्याच्याविषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत. यामध्येच त्याचा स्ट्रगल काळ, त्याचं यश-अपयश या सगळ्याविषयी चाहते मोठ्या उत्सुकतेने जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच रोहितने बालपणी कसे कष्ट उपसले याविषयी जाणून घेऊयात. रोहितने कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या स्ट्रगलविषयी भाष्य केलं आहे.

"जेव्हा आम्ही सांताक्रूझमध्ये रहायचो तेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं. माझ्या आईजवळ जी जमापुंजी होती ती सुद्धा संपली होती. त्यामुळे आम्ही दहिसरमध्ये माझ्या आजीच्या घरी रहायला गेलो. त्यावेळी माझ्यासोबत हे असं का घडतंय हे मला कधीच कळलं नाही. माझ्या कुटुंबाने कायम खूप परिश्रम आणि संघर्ष केला. मी मुंबईतील सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळे मी या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत. त्यातून मला खूप शिकायला मिळालं", असं रोहित म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मुंबई शहरात काम करणाऱ्यांच्या मनात कामाविषयी वेगळीच भावना असते. ते काम मिळवण्यासाठी खूप कष्ट करतात. इथे रिक्षाचालकापासून ते पोहे विकणाऱ्यापर्यंत प्रत्येक जण मेहनत घेतो. इथे तुम्हाला आराम करायचा असेल तर एक दिवसापेक्षा जास्त वेळ तुम्ही रिकामं बसू शकत नाही. म्हणूनच हे शहर खूप प्रगतीशील आहे."

दरम्यान, रोहित सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत येत आहे. रोहित शेट्टीच्या आगामी बहुप्रतिक्षित 'सिंघम अगेन' मध्ये मोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ या स्टार अभिनेत्यांनंतर अर्जुन कपूरचीही या सिनेमात एन्ट्री झाली आहे.

टॅग्स :रोहित शेट्टीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमामुंबादेवी