लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरूनं उत्तम अभिनयशैली आणि सोज्वळपणा यांच्या जोरावर अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. ती सोशल मीडियावर चर्चेत असते. अलिकडेच रिंकू राजगुरूने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिनं अध्यात्मावर भाष्य केलं. रिंकू राजगुरूने ती आधी नास्तिक असल्याचे कबूल केले. मात्र, केदारनाथच्या वारीत घडलेल्या एका चमत्कारिक घटनेने तिचे आयुष्य आणि विचार पूर्णपणे बदलून टाकल्याचं तिनं सांगितलं.
अलिकडेच रिंकू राजगुरूनं राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी रिंकू म्हणाली, "मी आधी देवावर विश्वास ठेवत नव्हते. पण आयुष्यात अशा काही घटना घडल्या की मी अध्यात्माकडे वळले. केदारनाथला गेल्यानंतर काही घटनांमुळे माझा थोडाथोडा विश्वास बसायला लागला. मग मी उपवास वगैरे करत गेले आणि मला त्याचे काही अनुभवही आले. खरंतर मी आता खूप त्या गोष्टींकडे वळले. पूजा-पाठ, मंत्र, सण-उत्सव यामागे वैज्ञानिक कारणंसुद्धा आहेत. पण, एक कुठली तरी शक्ती आहे, जी तुम्हाला खेचते. जेव्हा त्याची इच्छा असते, तेव्हाच आपण त्या गोष्टी करतो किंवा मानायला लागतो. माझ्याबाबतीतही असंच झालं. माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आणि मग मी या गोष्टी करायला लागले. मला असं वाटलं की आता इथेच एक ती आशा आहे आणि शांतता आहे. मला घरात सकाळी देवपूजा, जप करायला आवडतं. त्यामुळे मी स्वत:साठी ते करते".
रिंकूने तिचा केदारनाथचा एक अंगावर शहारे आणणारा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, "मी गुरुवारी पौर्णिमेच्या दिवशी चालत केदारनाथला गेले होते. खूप थकले होते आणि पायही दुखत होते. दर्शन झाल्यावर मला वाटलं की परतीच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर मिळावं, कारण दुसऱ्या दिवशी आमचं फ्लाईट होतं. पण दोन-तीन तास वाट बघूनही हेलिकॉप्टर मिळेना. आम्हाला एक माणूस म्हणाला की हेलिकॉप्टर मिळेल. आम्ही दोन-तीन तास थांबलो. वाट बघून बघून शेवटी अंधार व्हायला लागला आणि मी देवाला म्हणाले की, मला हेलिकॉप्टर मिळूदे. मी माझं कुटुंबासह दर्शनाला येईन. नंतर एक माणूस आला आणि म्हणाला की आता हेलिकॉप्टर मिळणार नाही. तेव्हा मी खूप रडत होते. चिडली होते".
हेलिकॉप्टर मिळत नसल्याने वैतागलेली रिंकू रागाच्या भरात देवाला म्हणाली, "त्या त्रासात मी देवाला म्हणाले की 'हा काय देव आहे… काय ऐकतोय का… हेलिकॉप्टर पाहिजे म्हणाले पण तेही करत नाहीय…' असं बोलत-बोलत पुढे जात होते, तेव्हा मागून एक माणूस आला आणि त्याने हेलिकॉप्टरबद्दल विचारलं. तो म्हणाला फक्त दोनच सीट आहेत. त्यानंतर मी आनंदात पळत पळत जात होते आणि इतक्यात जोरात पडले. माझ्या गुडघ्याला लागलं. त्यानंतर मी देवाला म्हटलं की मी आता पुढे कधीच काहीच तक्रार करणार नाही, कारण मला तिथल्या तिथेच शिक्षा मिळाली. आता हे कसं झालं काय झालं माहीत नाही. कारण खूप लोक वाट बघत होते आणि त्यापैकी फक्त आम्ही दोघीच त्या हेलिकॉप्टरमधून गेलो. म्हणून माझा विश्वास बसला की, ती एक शक्ती आहे", असं तिने सांगितलं.
Web Summary : Actress Rinku Rajguru, formerly an atheist, now embraces spirituality after a transformative Kedarnath pilgrimage. A near miss with a helicopter ride led her to believe in a divine power that altered her life.
Web Summary : अभिनेत्री रिंकू राजगुरू, जो पहले नास्तिक थीं, केदारनाथ यात्रा के बाद आध्यात्मिकता की ओर मुड़ीं। एक हेलीकॉप्टर यात्रा से बाल-बाल बचने के बाद उन्हें एक दैवीय शक्ति पर विश्वास हुआ जिसने उनके जीवन को बदल दिया।