Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋचा इनामदारला लागली लॉटरी, बॉलिवूडच्या खानसह करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 11:15 IST

दिग्दर्शिक तिग्मांशु धुलिया यांनीही 'तुम बहुत माहीन काम करती हों', या शब्दांत ऋचाचं कौतुक केलं आहे.

ऋचा इनामदार... रुपेरी पडद्यावर नव्यानं नावारूपास आलेलं नाव. अनेक जाहिरातींतून झळकलेल्या या गोड चेहऱ्यानं 'वेडिंग चा शिनेमा' या चित्रपटातून आणि 'क्रिमिनल जस्टीस' या वेबसिरीजमधून आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांना अल्पावधीतच आपलंस केलं. एकाच वेळी दोन विरुद्ध टोकाच्या भूमिका साकारून या गुणी अभिनेत्रीनं आपलं अभिनयकौशल्य सिद्ध केलं आहे.

 

'वेडिंग चा शिनेमा' या चित्रपटात अत्यंत लाघवी, निरागस, चुलबुली, जिला पाहताक्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल आणि नावाला हुबेहूब साजेशी अशी 'परी' साकारली आहे . तर 'क्रिमिनल जस्टीस'मधून आयुष्यात अनेक अडथळे येऊनही त्यांचा खंबीरपणे सामना करणारी, 'मोडेन पण वाकणार नाही',अशी जिद्द बाळगणारी 'अवनी' प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या या दोन्ही भूमिकांचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

 दिग्दर्शिक तिग्मांशु धुलिया यांनीही 'तुम बहुत माहीन काम करती हों', या शब्दांत ऋचाचं कौतुक केलं आहे. आपल्या या दोन्ही भूमिकांबद्दल ऋचा सांगते, 'या दोन्ही भूमिका खूप भिन्न आहेत. 'वेडिंग चा शिनेमा'तील परी आणि माझ्या स्वभावगुणांत बऱ्यापैकी साम्य आहे. मुळात आम्ही दोघी डॉक्टर आहोत. आयुष्यातील हा टप्पा मी अनुभवाला आहे. त्यामुळे 'परी' ला पडद्यावर साकारणे मला सोपं झालं. 

परंतु 'क्रिमिनल जस्टीस 'मधील 'अवनी' साकारणं माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होतं. मुळात आयुष्याचा हा टप्पा मी अद्याप अनुभवलेलाच नाही. अनेक कठीण प्रसंगाना सामोरे जाणाऱ्या स्त्रिच्या मानसिकतेत, वर्तणुकीत होणारा बदल, वाईट अनुभवांमुळे आलेली परिपक्वता हे देहबोलीतून दाखवणे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. याशिवाय या भूमिकेसाठी मला वजनही वाढवायचे होते. 

विशेष म्हणजे हे वाढवलेले वजन मला 'परी' साठी त्वरित कमीसुद्धा करायचे होते. परंतु अभिनयावरील माझ्या निष्ठेमुळे मला या सर्व गोष्टी सहज शक्य झाल्या. एक आवर्जून सांगावेसे वाटते ते म्हणजे 'अवनी'चा शोध घेत असताना एक माणूस म्हणून मी अधिक समृद्ध झाले, मला माझाच नव्याने शोध लागला.' ऋचा आता शाहरुख खानसोबतही एका मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीत झळकत आहे.

टॅग्स :ऋचा इनामदार