हा चित्रपट अग्निशमन दलातील वीर जवानांच्या जीवनावर आधारलेला आहे. आजवर अनेक अग्नीवीरांनी कर्तव्य बजावताना वेळप्रसंगी स्वत:च्या प्राणांची आहुती देत इतरांचे प्राण वाचवत मानवतेचा संदेश जगाला दिला आहे. त्यांच्या शौर्याची आणि त्यांच्या कुटुंबाची कथा दिग्दर्शक राहुल ढोलकीया यांनी सादर केली आहे.
कथानक : अग्निशमन दलातील विठ्ठल सुर्वे, पत्नी रुक्मिणी आणि मुलगा अम्या यांच्या कथेत रुक्मिणीचा भाऊ पोलिस इन्स्पेक्टर समित सावंतचीही गोष्ट आहे. आग लागताच विठ्ठलची टिम बचावकार्यापासून आगीची कारणे शोधण्यापर्यंत सर्व कामे मेहनतीने करतात, पण कौतुक समितचे होते. अम्यादेखील वडीलांना नव्हे, तर मामाला हिरो मानतो. अशातच शहरात एका मागोमाग एक विविध ठिकाणी आगी लागतात आणि त्यावेळी तापमान प्रमाणापेक्षा कितीतरी पटीने जास्त वाढलेले असते. विठ्ठल त्याचा शोध घेतो, तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर येते.
लेखन-दिग्दर्शन : विषयासाठी दिग्दर्शक रहुल आणि लेखक विजय मौर्या यांचे कौतुक करावे लागेल. कथा साधी सोपी आहे. मनोरंजनाचे मसाले घुसवलेले नाहीत. गोष्ट सुरू सुरुवातीपासूनच अग्निशमन दलातील जवानांच्या जीवनावर प्रकाश टाकते. पोलिसांसारखेच त्यांनाही वेळेचे बंधन नसते. कधी भऱल्या ताटावरून, तर कधी ऐन समारंभातून त्यांना अग्नितांडवाच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवावे लागतात. पोटच्या मुलालाही आपल्या कामाचा अभिमान वाटत नसताना ते अविरतपणे कर्तव्य बजावतात. आगीनंतरचा रिसर्च आणखी डिटेलमध्ये हवा होता. खलनायकी चेहऱ्याचा पर्दाफाश क्लायमॅक्सपूर्वीच केला आहे. गीत-संगीताला वाव नाही.
अभिनय : प्रतीक गांधीने पुन्हा एकदा आपली व्यक्तिरेखा अगदी सहजपणे साकारली आहे. कुठेही अतिशयोक्ती न करता त्याने अग्निशमन दलातील जवानाच्या कॅरेक्टरला न्याय दिला आहे. दिव्येंदूने साकारलेला पोलिस इन्स्पेक्टरही लक्षात राहण्याजोगा आहे. त्यानेही चांगले काम केले आहे. मुख्य भूमिकेत नसूनही सैयामी खेर लक्ष वेधते. सई ताम्हणकरने गृहिणीची व्यक्तिरेखा चांगल्या प्रकारे साकारली आहे. सखी गोखलेची भूमिका लहान आहे. जितेंद्र जोशीने खलनायकी भूमिकेत जबरदस्त काम केले आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, व्हिएफएक्स, कला दिग्दर्शन, वातावरण निर्मितीनकारात्मक बाजू : गीत-संगीत, रहस्याचा उलगडाथोडक्यात काय तर अग्निशमन दलाच्या जवानांनी आजवर अनेकांचे प्राण वाचवले आहेत. प्रसिद्धीच्या झगमगत्या विश्वापासून दूर राहिलेल्या त्या सर्व नायकांना सलाम करण्याचा हा प्रयत्न एकदा तरी पाहायला हवा.