Join us  

मादाम तुसांमध्ये बसवले रणवीर सिंगचे दोन पुतळे; दीपिकाच्या बहिणीची हटके कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 5:37 PM

रणवीर सिंग फक्त भारतात स्टार राहिलेला नाही तर ग्लोबल स्टार बनलाय. एक गोड बातमी त्याने शेअर केली आहे.

बॉलिवूडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग नेहमीच चर्चेत असतो. वेगवेगळ्या भूमिका आणि हटके अंदाजामुळं तो नेहमीच लक्ष वेधून घेत असतो. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.  रणवीर सिंग फक्त भारतात स्टार राहिलेला नाही तर ग्लोबल स्टार बनलाय.  नुकतेच एक गोड बातमी त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

रणवीर सिंगच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. वाढत्या लोकप्रियतेने रणवीर सिंग लंडनमधील मादाम तुसां संग्रहालयात पोहचवले आहे. मादाम तुसां संग्रहालयात रणवीर सिंगचे एक नाही तर दोन मेणाचा पुतळा उभारण्यात आले आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्याने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर करत आनंद व्यक्त केला. रणवीर सिंगच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

दीपिका पदुकोणची बहीण अनिशा पदुकोणने केलेल्या कमेंटनं सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. रणवीर सिंगच्या फोटोवर कमेंट करताना अनिशाने लिहिलं,  'अपना टाइम आ गया'. त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये दोन मेनाच्या पुतळ्यासोबत रणवीर दिसत आहेत.  पण, फोटोत कोणता रणवीर खरा हे ओळखणे अवघड झाले आहे. तर रणवीरचा एक पुतळा हा शेरवानीमध्ये आहे, तर दुसरा काळ्या रंगाच्या थ्री-पीस सूटमध्ये आहे. आणि खरा रणवीर हा काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये मध्यभागी उभा आहे. 

रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, नुकतेच त्याचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. आता रणवीर रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचा लूक समोर आला आहे. याशिवाय तो 'डॉन ३' मध्येही पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :रणवीर सिंगबॉलिवूडसेलिब्रिटीदीपिका पादुकोणमॅडम तुसाद संग्रहालय