Join us  

"आदित्यचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले" राणी मुखर्जीने पाहिला कठीण काळ, म्हणाली, 'शाहरुखमुळे...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 1:08 PM

राणी मुखर्जीने पती आदित्य चोप्राची परिस्थिती पाहिली अन्...

बॉलिवूडची गुणी अभिनेत्री राणी मुखर्जी चोप्रा कुटुंबाची सून आणि यश चोप्रा फिल्म्सची मालकीण आहे. तिचे पती आदित्य चोप्रा प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शत आहे. आदित्य चोप्रा माध्यमांसमोर फारसे येत नाहीत. तसंच कुठेच मुलाखतीही देताना दिसत नाहीत. दरम्यान मधल्या काळात YRF वर मोठं आर्थिक संकट आलं होतं. यातून आदित्य चोप्रा कसे बाहेर पडले याचा खुलासा राणी मुखर्जीने केला आहे. शाहरुख खानच्या एका सिनेमामुळे yrf वरचं आर्थिक संकट दूर झाल्याचं ती म्हणाली. कोणता आहे तो सिनेमा?

राणी मुखर्जी नुकतीच FICCI Frames 2024 कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी ती म्हणाली, "आदित्यकडे काही बिग बजेट चित्रपट होते. पण कोरोनामुळे ते रिलीज होऊ शकले नव्हते. त्यात सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याचं निर्मात्यांवर प्रेशर होतं. पण आदित्य फार संयमी आहे. तो म्हणाला हे सिनेमे थिएटरसाठीच बनले आहेत मी तिथेच रिलीज करणार. ओटीटीसाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर आली पण त्याने हिंमत सोडली नाही. जेव्हा सिनेमे थिएटरमध्ये रिलीज केले तेव्हा ते जोरदार आपटले. कारण कोरोनानंतर प्रेक्षकांची सिनेमांबाबतीत आवड बदलली होती. आदित्यचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. हा मोठा आर्थिक झटका होता.'

ती पुढे म्हणाली, "तरी आदित्यला काहीतरी चमत्कार होईल असा विश्वास होता. त्याला फळ मिळेल असं वाटत होतं. पण तसं झालंच नाही. पठाण सिनेमा रिलीज होईपर्यंत असं काहीच झालं नाही. पठाण सिनेमा यशराज फिल्म्ससाठी लकी ठरला. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. तो फक्त तुमच्या हिंमतीची परिक्षा घेत असतो. आदित्यजवळ ती हिंमत होती आणि मी त्याच्या याच हिंमतीला सलाम करते."

YRF चे कोरोनानंतर 'बंटी और बबली 2', 'जयेशभाई जोरदार','सम्राट पृथ्वीराज' हे चित्रपट आले आणि फ्लॉप झाले, एका महिन्यानंतर रणबीर कपूरचा 'शमशेरा' आला तोही जोरदार आपटला. त्यानंतर थेट 25 जानेवारी 2023 रोजी आलेल्या शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाने सर्व चित्रच पालटलं. 

टॅग्स :राणी मुखर्जीआदित्य चोप्रा सिनेमाबॉलिवूडपठाण सिनेमाशाहरुख खान