Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्वा मंत्रीजी व्वा! ‘शेरा’ला भेटायला वेळ आहे...; सलमानच्या बॉडीगार्डला भेटणारे आरोग्यमंत्री झाले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 12:39 IST

सध्या या आरोग्यमंत्र्यांवर सोशल मीडियावर जबरदस्त टीका होतेय.  लोकांसाठी वेळ नाही मग सेलिब्रिटींच्या बॉडीगार्डला भेटायला कसा वेळ मिळाला?अशा शब्दांत लोकांनी त्यांना सुनावले आहे.

ठळक मुद्दे‘आज मी गुरमित सिंह जॉली उर्फ शेरा यांची भेट घेतली,’ असे ट्विट शर्मा शेअर केले. त्यांचे हे ट्विट  पाहून नेटकरी संतापले.

कोरोना महामारीने देशाच्या चिंता वाढवल्या आहेत. पहिल्या लाटेने लोकांचे रोजगार हिरावले, स्थलांतरित मजुरांचे हाल केलेत. दुसरी लाट लोकांच्या जीवावर उठली आहे. औषधांचा तुटवडा, हॉस्पीटलमध्ये बेडची कमतरता आणि प्राणवायुअभावी कोरोना रूग्णांचे नातेवाईक सैरभैर झाले आहेत. अनेक निष्पापांचे बळी जात आहेत आणि अशात राजस्थानचे आरोग्यमंत्री डॉ़ रघु शर्मा (Dr. Raghu Sharma) सलमान खानच्या (Salman Khan) बॉडीगार्डला भेटलो, म्हणून शेखी मिरवत आहेत. सध्या या आरोग्यमंत्र्यांवर सोशल मीडियावर जबरदस्त टीका होतेय.  लोकांसाठी वेळ नाही मग सेलिब्रिटींच्या बॉडीगार्डला भेटायला कसा वेळ मिळाला?अशा शब्दांत लोकांनी त्यांना सुनावले आहे.

डॉ. रघु शर्मा यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट करुन सलमान खानच्या बॉडिगार्डला भेटल्याची माहिती दिली. ‘आज मी गुरमित सिंह जॉली उर्फ शेरा यांची भेट घेतली,’ असे ट्विट शर्मा शेअर केले. त्यांचे हे ट्विट  पाहून नेटकरी संतापले.

 ‘व्वा मंत्रीजी व्वा.. राज्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. सामान्य लोकांचे हाल होत आहेत. या लोकांना भेटण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. परंतु सेलिब्रिटींच्या बॉडिगार्डला भेटायला वेळ आहे. त्यांच्या समस्यांकडे तुम्ही जातीने लक्ष देत आहात,अशा आशयाच्या कमेंट्स काही नेटक-यांनी   आपला संताप व्यक्त केला.

अन्य एका युजरने तर शर्मा यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. राजस्थानसारख्या एका मोठ्या राज्याचे तुम्ही आरोग्यमंत्री आहात आणि एका बॉडीगार्डसोबतचा फोटो शेअर करून त्याला भेटण्याची पोस्ट तुम्ही शेअर करता. शेराला लोक सलमानमुळे ओळखतात. आता तो सुद्धा सेलिब्रिटी झाला, असे आम्ही मानायचे का? असे या युजरने लिहिले.

 

टॅग्स :सलमान खानराजस्थान