Join us

Puneeth Rajkumar गेला, पण जाताना चार अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश पेरून गेला...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 13:06 IST

Puneeth Rajkumar : कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमारने 29 ऑक्टोबर रोजी या जगाचा निरोप घेतला.

कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमारने (Puneeth Rajkumar) 29 ऑक्टोबरला अचानक जगाचा निरोप घेतला आणि अख्खी साऊथ इंडस्ट्री हळहळली. जिममध्ये व्यायाम करत असताना छातीत दुखू लागलं आणि काही तासांतच पुनीतच्या निधनाची बातमी आली.   पुनीत राजकुमारच्या अकाली निधनानं साऊथ फिल्म इंडस्ट्रीसह बॉलिवूडवरही शोककळा पसरली. चाहत्यांनाही शोक अनावर झाला. पुनीत कायमचा गेला. पण जाताना चार जणांच्या अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश पेरून गेला.होय, पुनीतने वडिलांप्रमाणेच नेत्रदानाचा संकल्प केला होता.  त्यानुसार त्याच्या मृत्यूंनंतर नेत्रदान करण्यात आलं. त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा तासांत डॉक्टरांच्या पथकाने नेत्रदानासाठी शस्त्रक्रिया केली. त्याच्या या नेत्रदानामुळे चार दृष्टिहिनांच्या आयुष्यात नवा प्रकाश आला आहे.

  रिपोर्टनुसार, नारायण नेत्रालय या ठिकाणी पुनीतच्या डोळ्यांचं ट्रान्सप्लांट करण्यात आलं आहे. नव्या तंत्रज्ञानानानुसार डॉक्टरांनी पुनीतचे दोन कॉर्निया 4 भागात विभाजित करून 3 पुरुष आणि 1 महिला अशा चार रूग्णांमध्ये कॉर्निया ट्रान्सप्लांट केला. या चारही रूग्णांचे वय 20-30 च्या घरात आहे.  हे सर्व लोक गेली सहा महिने ट्रांसप्लांटच्या प्रतीक्षेत होते. मात्र कोरोना महामारीमुळे नेत्रदान पूर्णपणे थांबवण्यात आलं होतं. मात्र पुनीतच्या नेत्रदानानंतर या चौघांनाही नवी दृष्टी मिळाली.  

पुनीत केवळ अभिनेताच नव्हता तर गायकही होता.  17 मार्च 1975 रोजी जन्मलेल्या पुनीतने 2002 मध्ये ‘अप्पू’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.  29हून अधिक चित्रपटांमध्ये त्याने काम केले होते. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांपैकी पुनीत एक होते.

 पुनीतचे वडील राजकुमार हे इंडस्ट्रीतील मोठे नाव होते. ते कन्नड चित्रपटसृष्टीचे आयकॉन मानले जायचे. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे कन्नड इंडस्ट्रीतील ते पहिले अभिनेता होते. लहानपणापासूनच पुनीतचे वडील राजकुमार त्याला आणि त्याच्या बहिणीला चित्रपटाच्या सेटवर घेऊन जायचे. पुनीतचे वडील सुपरस्टार अभिनेते राजकुमार यांनीही आपले डोळे दान केले होते. डॉ. राजकुमार यांचं निधन २००६ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झालं होतं. 

टॅग्स :सेलिब्रिटी