Join us  

‘मास’ ची पातळी उंचावण्याची जबाबदारी निर्माता-दिग्दर्शकाची : दिग्पाल लांजेकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 8:26 PM

आपण ‘क्लास’ बरोबरच ‘मास’कडे जाण्याच्या नादात आपली पातळी उतरायचा प्रयत्न करण्याची गरज नाही...

ठळक मुद्देपिफ महोत्सव : ‘चित्रपटांचे ओटीटी प्लॅटफॉर्म व यशस्वी मार्केटिंग’ या विषयावर चर्चासत्रातुमचा प्रेक्षक कोण आहे हे जाणून त्याचे मार्केटिंग करण्यावर भर दिला जावा.

पुणे : तुमच्या डोक्यात चित्रपटाविषयी अनेक क्रिएटिव्ह गोष्टी असतात. मात्र, मार्केटिंगच्या दृष्टीने त्या बरोबर असतीलच असे नाही. त्यामुळे मार्केटिंगचा विचार करूनच चित्रपट लिहिला जावा. याशिवाय आपण ‘क्लास’ बरोबरच ‘मास’कडे जाण्याच्या नादात आपली पातळी उतरायचा प्रयत्न करण्याची गरज नाही. या उलट ‘मास’ची पातळी उंचावण्याची जबाबदारीदेखील निर्माते आणि दिग्दर्शकाची आहे, असे स्पष्ट मत प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केले.१८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा अंतर्गत मंगळवारी ‘चित्रपटांचे ओटीटी प्लॅटफॉर्म व यशस्वी मार्केटिंग’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी लांजेकर बोलत होते. पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महामंडळाचे संचालक डॉ. जब्बार पटेल या वेळी उपस्थित होते.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सहयोगाने सदर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, दिग्दर्शक व लेखक दिग्पाल लांजेकर, चित्रपट वितरण क्षेत्रातील तज्ज्ञ अजय फुटाणे, डॉ. सलील कुलकर्णी यांच्याशी विनोद सातव यांनी संवाद साधला. मराठी भाषिक प्रेक्षक मल्याळम चित्रपट सबटायटल्सवरून आवडीने पाहतो, अशाच पद्धतीने इतर भाषेतील प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे वळाले पाहिजेत. यासाठी मराठी निर्माते, दिग्दर्शक यांनी सर्वसमावेशक चित्रपटांची निर्मिती करावी. जेणेकरून मराठी चित्रपट ‘युनिव्हर्सल’ होतील, याकडे लक्ष वेधून डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले, ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ निर्मात्यांसाठी रेव्हेन्यू जनरेशनसाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणून तो पुढे येत आहे. मात्र, आपले चित्रपट चित्रपटगृहात टिकावेत यासाठी दिग्दर्शक व निर्मात्यांनी चित्रपटाची कथा, व्हिज्युअल इलेमेंट यांकडे देखील लक्ष दिले पाहिजे.अजय फुटाणे म्हणाले, वितरण व मार्केटिंग हा चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र, हे महत्त्व आज अनेकांना समजत नाही. चित्रपट तयार झाल्यावर त्याच्या मार्केटिंग व वितरणाकडे वळण्यापेक्षा आधी सहा महिने त्याच्या विचार व्हायला हवा. तुमचा प्रेक्षक कोण आहे हे जाणून त्याचे मार्केटिंग करण्यावर भर दिला जावा. मागील दोन वर्षांचा विचार केला तर २०१८ साली एकूण ११९ मराठी चित्रपटांपैकी केवळ १७ चित्रपट हे १ कोटी रुपयांचा गल्ला जमविण्यात यशस्वी झाले. तर, २०१९ मध्ये ११३ पैकी केवळ १० चित्रपटांना हे जमले. या यशस्वी चित्रपटांचा विचार केला तर त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे ते शक्य होऊ शकले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.या शिवाय चित्रपटांचा ‘इन्श्युरन्स’ या विषयावर द न्यू इंडिया एश्युरन्स कंपनीच्या मीनाक्षी देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. चित्रपटाशी निगडीत इन्श्युरन्सच्या अनेक पयार्यांची माहिती त्यांनी या वेळी दिली.

........

मराठी चित्रपटांच्या वितरणासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे सातत्याने प्रयत्न करीत असून, राज्य सरकारशी बोलून तालुक्याच्या ठिकाणी काही चित्रपटगृहे तसेच टूरिंग टॉकीज अशा संकल्पनांवर चर्चा सुरु आहे, अशी माहिती या वेळी मेघराज राजेभोसले यांनी दिली.

टॅग्स :पुणेदिग्पाल लांजेकरसिनेमापीफ