बॉलिवूड ते हॉलिवूडचा प्रवास करणाऱ्या प्रियंका चोप्राचे जगभरात चाहते आहेत. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. लग्न झाल्यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. पण, भारतीय चाहत्यांना तिच्या बॉलिवूड चित्रपटांची उणीव भासतेय. प्रियंका चोप्राचे चाहते तिच्या बॉलिवूडमध्ये कमबॅकची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपुर्वीच अभिनेत्रीने बॉलिवूड कमबॅक करणार असल्याचं सांगितलं होतं. अशातच आता बातमी समोर येत आहे की ती एस.एस राजामौली यांच्या SSMB29 या बिग बजेट चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात महेश बाबू मुख्य भूमिकेत आहे.
'फिल्मफेअर'च्या रिपोर्टनुसार, एस.एस राजामौली यांनी प्रियंका चोप्राला सिनेमा ऑफर केला आहे. दोघांमध्ये चर्चा सुरू असून सध्या ती सकारात्मक दिशेने सुरू आहे. प्रियांका लवकरच हा चित्रपट साईन करेल अशी शक्यता आहे. जर प्रियांकाने एसएस राजामौलीचा हा चित्रपट साइन केला, तर हा तिचा बॉलिवूडमधील कमबॅक चित्रपट असू शकतो.
प्रियंकाचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याचे नाव होते 'द स्काय इज पिंक'. अभिनेत्रीने अलीकडेच रेड सी फिल्म फेस्टिव्हलदरम्यान बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले होते. सध्या प्रियंकाने 'सिटाडेल' या मालिकेच्या दुसऱ्या सीझनचे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय ती 'द ब्लफ' आणि 'हेड्स ऑफ स्टेट'सारख्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. या तिन्ही प्रोजेक्टमध्ये प्रियांकाचा वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे.