Join us  

ललित कला केंद्रात विद्यार्थी कलावंतांवरील हल्ल्याचा प्रियदर्शिनीने व्यक्त केला निषेध; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 12:59 PM

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनीने केला 'दहशतवादी कृत्य' असा उल्लेख

SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सादर झालेल्या एका नाटकावरुन मोठा वादंग झाला. या नाटकात सीतेची भूमिका साकारणाऱ्या पात्राच्या हातात सिगारेट आणि दारुची बाटली होती. रामायणाचा विपर्यास केल्याच्या आरोपावरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने(अभाविप) ने दखल देत नाटकाचा प्रयोग बंद पाडला. यावेळी चांगलाच गोंधळ उडाला. या घटनेनंतर समाजातून विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकरने (Priyadarshini Indalkar) नाटकातील कलाकारांची बाजू घेतली आहे. 

प्रियदर्शिनी काय म्हणाली?

प्रियदर्शिनी इंदलकरने इन्स्टाग्रामवर दत्ता पाटील या युझरची पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की, "ललित कला केंद्र, पुणे येथील विद्यार्थी कलावंतांवर हल्ला करुन नाटक बंद पाडणाऱ्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध.."

नाटक बंद पाडून हल्ला करणं योग्य नाही म्हणत प्रियदर्शिनीच्या पोस्टमधून आरोपींना थेट दहशतवादीच म्हटलं आहे. प्रियदर्शिनी स्वत: मूळची पुण्याची आहे. शिवाय ती आधीपासूनच मनोरंजनसृष्टीशी जोडलेली आहे. तिला 'सावित्रीची लेक' हा पुरस्कारही मिळाला आहे. प्रियदर्शिनीने केलेल्या या पोस्टवर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

नेमकं प्रकरण काय?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून शुक्रवारी सायंकाळी रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित ‘जब वी मेट’ या नावाच्या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रामायणाचा विपर्यास केल्याच्या आरोपावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी नाटकाचा प्रयोग बंद पाडला. यावेळी मोठा गोंधळ झाला. त्यानंतर ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात धाव घेतली. ‘अभाविप’चे पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन सुनील हरपुडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मध्यरात्रीनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर केंद्रप्रमुखासह सहा जणांना अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आता या प्रकरणात आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतामहाराष्ट्राची हास्य जत्रापुणे विद्यापीठनाटक