प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. प्रसादच्या अभिनय क्षेत्रातील करिअर आणि यशामध्ये मंजिरीचा मोठा वाटा आहे. मध्यमवर्गीय घरातून आलेल्या आणि अभिनयात करिअर करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रसादला मंजिरीने पावलोपावली साथ दिली. मंजिरीदेखील कलाविश्वात कार्यरत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्य संघर्षाबद्दल भाष्य केलं. रंग-रुपावरुन लहानपणापासून हिणवलं जायचं असा खुलासा तिने केला.
मंजिरीने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "लहानपणापासून माझा रूप आणि रंगापासूनचा स्ट्रगल आहे. मला लहानपणापासून लोक काळी म्हणून चिडवतात. आणि चिडवणं म्हणजे ते चिडवायचे. म्हणजे वाईट नको वाटून घेऊ यार, गंमत केली असं म्हणून जी झालर लावली जाते ना ती नसायची. काळी असणं किंवा बुटकी असणं...रंगरुपावरुनच मुळात बोललं जातं. आपण ट्रोलिंग म्हणतो ना...कित्येक वेळा मला कमेंट असतात की तुम्ही आता म्हाताऱ्या दिसता. हो, मग मी आता ४७ वर्षांची आहे. मी आता म्हातारी नाही दिसले तर मग...याला काहीच अर्थ नाहीये ना. का नाही दिसणार मी म्हातारी?"
"आपल्याकडे मुलींना, बायकांना जितकं डिमोटिव्हेट करता येईल तेवढं केलं जातं. त्याची संख्या जास्तच आहे. फार कमी वेळा बायकांना मोटिव्हेट केलं जातं. तू हे करू नकोस, हे पहिलं वाक्य असतं. मुलींना जपण्याची भावना कळू शकते. मुलींची काळजी आहे, हे कळतं. मला मुलगी असती तर मीदेखील हेत केलं असतं. पण, त्याचं प्रमाण काळाप्रमाणे बदललं पाहिजे. ते शब्दही बदलले पाहिजेत. त्यावर चर्चा झाली पाहिजे. पालक म्हणून मुलींची मतं तुम्ही जाणून घेतली पाहिजेत. ८०-९०च्या दशकात आपले आईवडील आपल्याला बसून हे विचारत नव्हते की काही प्रॉब्लेम आहे का? त्यांनाच त्यांचे एवढे प्रॉब्लेम होते. आता मी त्यांचं टेन्शन समजू शकते. पण, आता काळ बदलला आहे. तर आता तरी करूया", असंही मंजिरीने पुढे सांगितलं.