Join us  

लाल साडी नेसून प्राजक्ता माळीचा रोड शोमध्ये सहभाग, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांचा केला प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 11:45 AM

रोड शोमध्ये प्राजक्ताची झलक पाहण्यासाठी तुफान गर्दी

लोकसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पक्षांनी उमेदवारांची घोषणाही केली आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात प्रचार करत आहे. सेलिब्रिटींना प्रचारात सहभागी करुन घेणं काही नवीन नाही.  चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री व सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) उभे राहिले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर-वणी-आर्णी मध्ये रोड शोचे आयोजन करण्यात येत आहे. अख्ख्या महाराष्ट्राला जिने प्रेमात पाडलं ती अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) काल मुनगंटीवारांच्या रोड शोमध्ये सहभागी झाली होती. 

चंद्रपूरच्या आर्णी येथे काल संध्याकाळी 5 वाजता सुधीर मुनगंटीवार यांच्या रोड शोला सुरुवात झाली. यावेळी प्राजक्ता माळीने सर्वांचंच लक्ष वेधलं. लाल काठापदराची साडी, सोन्याचे दागिने अशा लूकमध्ये ती दिसली. सनरुफ कारमधून तिने प्रवास केला. यावेळी पूर्णवेळी सनरुफमधून उभी राहत ती  चाहत्यांना अभिवादन करत होती. प्राजक्ताला पाहताच आर्णीच्या नागरिकांना एकच जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात हा रोड शो पार पडला. प्राजक्ताचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्राजक्ता माळी सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येते. पहिल्या एपिसोडपासून ती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. 'वाह दादा वाह'या तिच्या प्रतिक्रियेवर तर अख्खा महाराष्ट्र फिदा झाला. सध्या निवडणूकांचं वारं मनोरंजनसृष्टीतही वाहत आहे. प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावते. त्यामुळे ती राजकारणात येणार का अशीही चर्चा सुरु झाली. मात्र सध्या तसा विचार केला नसल्याचं ती मुलाखतींमधून म्हणाली आहे. तरी भाजपाचे कार्यक्रम असो किंवा आता प्रचार प्राजक्ता सक्रीयपणे सहभाग घेताना दिसत आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीसुधीर मुनगंटीवारचंद्रपूरलोकसभा निवडणूक २०२४मराठी अभिनेता