रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असतं मैत्रीचं नातं. याच मैत्रीच्या नात्यावर आधारित आजवर अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अशातच आता 'कलर्स मराठी'वर पाच भिन्न स्वभावाच्या मैत्रीणींची भन्नाट गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. 'पिंगा ग पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga Serial ) असं या नव्या मालिकेचं नाव असून यात पाच मैत्रीणींची, त्यांच्या स्वप्नांची अनोखी दुनिया प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्या शेटे, विदिशा म्हसकर, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब आणि आकांक्षा गाडे या अभिनेत्री मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. वैभव चिंचाळकर या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.
'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेत वकील होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आपल्या नवऱ्याच्या मदतीने मुंबईत आलेली जळगावची वल्लरी जेव्हा इथे अनेक वर्ष राहून स्ट्रगल करणाऱ्या मिठू (सातारा), तेजा (पुणे), श्वेता (सोलापूर) आणि प्रेरणा (कोकण) यांच्यासोबत पेइंग गेस्ट म्हणून राहू लागते. तेव्हा या शहरात रंगलेल्या मुलींवर वल्लरीसोबत आलेला गावचा रंग चढू लागतो. सुरुवातीला वल्लरीला घरातून काढण्यासाठी टपलेल्या या मुली हळू हळू तिच्या खास मैत्रिणी कशा बनतात याचा हा रंजक प्रवास आहे.
'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेत प्रेक्षकांना मैत्रीचे अनेक रंग पाहायला मिळतील. पण त्या सोबतच स्त्रियांच्या भावविश्वाचे विविध पैलू अतिशय मनोरंजक पद्धतीने आपल्याला पहायला मिळतील. प्रेम, लग्न, करियर, पालकांसोबत असलेलं त्यांचं नातं, शहरात एकट्या राहणाऱ्या मुलींकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, रोजच्या आयुष्यात त्यांना येणाऱ्या अडचणी आणि या सगळ्या अडचणीवर मात करत एकमेकांच्या मदतीने ठामपणे उभ्या राहणाऱ्या या पाच महिलांची गोष्ट म्हणजेच 'पिंगा गं पोरी पिंगा'. प्रत्येक महिलेच्या मनाचा आरसा दाखवणारी ही मालिका आहे.