मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी त्यांच्या कारकीर्दीत आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. नायक, खलनायक, विनोदी, चरित्र अशा सर्वच भूमिका त्यांनी उत्तम साकारल्या आहेत. अशोक सराफ यांच्या कलाविश्वातील अतुलनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना 'पद्मश्री' (Ashok Saraf Padma Shri Award) हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर केला आहे. त्यानंतर चाहत्यांसोबत कलाकारदेखील त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान आता अभिनेता स्वप्निल जोशीनेदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनंदन केले आहे.
अभिनेता स्वप्निल जोशीने इंस्टाग्रामवर अशोक सराफ यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, मराठी चित्रपटसृष्टीचा आधारस्तंभ, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अशोक मामांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचा आनंद शब्दांत मांडता येणार नाही! खूप भारी फिलिंग आहे! मामा….आमचे तुमच्यावर प्रेम आहे! पूर्णपणे रोमांचित! निवेदिता ताई, तुमचा कालचा कॉलवरचा आनंदी चेहरा नेहमी लक्षात राहील!
मागील वर्षी अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही सम्मानित करण्यात आले होते. तर या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांच्या शिवाय कॅलिग्राफी मास्टर अच्युत पालव, गायक अरिजीत सिंह यांनाही 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे.
वर्कफ्रंटअशोक सराफ सध्या छोट्या पडद्यावर काम करताना दिसत आहेत. ते अशोक मा. मा. या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. शेवटचे ते नवरा माझा नवसाचा २ सिनेमात काम करताना दिसले. या सिनेमात अभिनेता स्वप्निल जोशी मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.