By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:37 IST
1 / 8आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बेर्डे आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परत येत आहेत. 2 / 8स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणाऱ्या 'काजळमाया' या गूढ मालिकेत त्या 'कनकदत्ता' या महत्त्वाकांक्षी भूमिकेत दिसणार आहेत.3 / 8'काजळमाया' ही मालिका चेटकीण वंशामधील पर्णिका नावाच्या अत्यंत सुंदर पण क्रूर चेटकीणीची कथा आहे. पर्णिका ही तंत्रविद्येत पारंगत आहे, पण ती कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधिसाधू आहे. चेटकीण वंश वाढवण्याचे एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे.4 / 8प्रिया बेर्डे साकारत असलेली 'कनकदत्ता' ही याच पर्णिकाची आई आहे. कनकदत्ता ही सूडाच्या भावनेने पेटलेली, अत्यंत खुनशी आणि मोठ्या डोळ्यांची आहे. तिला आपल्या चेटकीण मुलीचा (पर्णिका) अभिमान आहे आणि तिने वंश पुढे वाढवावा अशी तिची तीव्र इच्छा आहे. 5 / 8कनकदत्ता आपल्या मुलीच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला नेहमीच खतपाणी घालते. कनकदत्ता आणि पर्णिका आपले ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी होतात का, याची उत्कंठावर्धक कथा 'काजळमाया' मालिकेत पाहायला मिळेल.6 / 8कनकदत्ताच्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री प्रिया बेर्डे म्हणाल्या, 'माझ्या आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत मी अशा प्रकारची भूमिका कधीही साकारलेली नाही. कनकदत्ताला पाहताच प्रेक्षकांना धडकी भरेल.' 7 / 8'ती सहजपणे वेषांतर करते आणि तिला संमोहन विद्या अवगत आहे. या भूमिकेला अनेक वेगळे पैलू आहेत. प्रेक्षकांना ही भूमिका नक्कीच आवडेल, याची मला खात्री आहे.', असे प्रिया बेर्डे म्हणाल्या.8 / 8नवी गूढ मालिका 'काजळमाया' २७ ऑक्टोबरपासून दररोज रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.