‘बिग बॉस’च्या मते रोहन कप्तानशिपमध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरल्याने या आठवड्याच्या मध्यावधीतच बिग बॉसने कप्तानशिपसाठी घरातील सदस्यांना (नॉमिनेट सदस्य सोडून) एक टास्क दिला होता. टास्कनुसार प्रत्येकाच्या गळ्यात आपल्या प्रतिस्पर्धी सदस्याच्या गळ्यात लाल रंगाचे पाणी असलेल्या ट्यूब घालण्यास सांगितले होते. बजर वाजताच एक ट्यूब घरात ठेवलेल्या काचेच्या भांड्यात रिकामी करावी लागत असे.
टास्कच्या शेवटच्या टप्प्यात या ट्यूब रिकाम्या करण्यात घरातील सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याने बिग बॉसने दुसरा टास्क देत घरातील वातावरण तप्त केले. या टास्कनुसार एक बोर्ड घरात ठेवण्यात आला होता. हा बोर्ड सदस्यांना रंगाच्या सहाय्याने रंगवायचा होता. जो सदस्य हा बोर्ड अधिक रंगवेल तोच त्याला टास्क विनर घोषित केला जाणार होता. त्यानुसार मनवीर गुर्जर आणि गौरव चोपडा यांच्यात टास्कवरून जुंपली. दोघांनीही एकमेकांना धक्काबुक्की केली. मात्र याचदरम्यान मनवीर पाय सटकल्याने तो बोर्डवर जोरात पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
या घटनेमुळे घरातील सर्वच सदस्य आवाक् झाले. मनवीरचे मित्र मनू आणि मोना या घटनेमुळे चागंलेच दुखावले गेले.
प्रियंका जग्गाही जखमी
लोपामुद्रा राऊत, प्रियंका जग्गा आणि नितिभा कौल घरातील स्विमिंग पुलात हसत-खेळत आंघोळ करीत होत्या. मात्र यामुळे प्रियंका जखमी झाली. प्रियंकासोबत घडलेल्या या घटनेस लोपामुद्रा आणि नितिभा यांनी एकमेकींना दोष देण्यास सुरुवात केली.
त्यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असतानाच स्वामी ओम यांनी लोपामुद्राशी पंगा घेतला. त्यामुळे संतापलेल्या लोपाने टिशू पेपरचा बॉक्स थेट स्वामी ओम यांच्या दिशेने भिरकावला. स्वामी ओम यांनीदेखील नेहमीप्रमाणे बिग बॉसकडे माझ्या जिवाला धोका असल्याची तक्रार केली. मात्र संताप अनावर झालेल्या लोपाने स्वामी ओमला खडेबोल सुनावत ‘तुम्हाला मी टिशू पेपर बॉक्सने नव्हे तर कानाखाली मारेल’ असे म्हटले. त्यामुळे घरातील वातावरण अधिकच तापले गेले आहे.