Join us  

Facts: बैलगाडीतून गेली होती पहिल्या रामायणावरील सिनेमाची कमाई, जपानचं 'रामायण' भारतात झालं बॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 2:07 PM

1 / 10
देशभरातील वातावरण सध्या श्रीराममय झालं आहे. समस्त रामभक्तांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामललाची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन झालं. रामानंद सागर यांच्या रामायण मध्ये प्रभू श्रीराम आणि सीता मातेच्या भूमिकेत झळकलेले अरुण गोविल आणि दीपिका चिखलियाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सामील झाले.
2 / 10
रामायणावर अनेक मालिका, चित्रपट रिलीज झाले आहेत. १०७ वर्षांपूर्वी 'लंका दहन' हा पहिला रामायणावर सिनेमा आला. भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळकेंनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.
3 / 10
त्याकाळी स्त्रिया सिनेमात काम करत नसल्याने एकाच अभिनेत्याने राम आणि सीता अशा दोन्ही भूमिका साकारल्या. त्या अभिनेत्याचं नाव होतं अन्ना साळुंके होतं. रामाचा १४ वर्षांचा वनवास ते रावणाचा वध सिनेमात दाखवण्यात आलं.
4 / 10
'लंका दहन' सिनेमाची पहिली स्क्रीनिंग मुंबईच्या मॅजेस्टिक हॉलमध्ये झाली होती. तेव्हा सिनेमाचं तिकीट घेण्यासाठी तिकीट खिडकीबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तिकीटाची कमाई अक्षरश: पिशव्यांमध्ये भरुन बैलगाडीतून निर्मात्यांच्या ऑफिसमध्ये पोहचवली जात होती. त्याकाळी १० दिवसातच सिनेमाने 35 हजार रुपये कमावले होते.
5 / 10
1940 च्या कालखंडात बोलक्या चित्रपटांना सुरुवात झाली. तेव्हा प्रेम अदीब या मुस्लिम अभिनेत्याचं नाव आघाडीवर होतं. त्यांनी २५ वर्षांच्या करिअरमध्ये 60 चित्रपटांमध्ये काम केलं. यामध्ये रामायणावर आधारित आलेल्या 8 सिनेमांमध्ये त्यांनी श्रीरामाची भूमिका साकारली. यामध्ये भरत मिलाप, राम राज्य, राम बाण, राम विवाह, राम नवमी, राम हनुमान युद्ध, राम लक्ष्मण, राम भक्त बिभीषण या सिनेमांचा समावेश आहे.
6 / 10
साऊथ सुपरस्टार NTR ला देखील पौराणिक सिनेमांमध्ये श्रीराम आणि श्रीकृष्णच्या भूमिकेत खूप लोकप्रियता मिळाली. लोक खरोखरंच त्यांना राम समजायला लागले. त्यांनी 'लव कुश'(1963) आणि 'श्री रामंजनेय युद्धम'(1974) मध्ये रामाची भूमिका साकारली.
7 / 10
यानंतर ५० च्या दशकात पौराणिक विषयांवर आधारित सिनेमांना ब्रेक लागला. नंतर थेट 1980-90च्या दशकात रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली. या मालिकेची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये दिसून येते. ही मालिका इतकी ऐतिहासिक होईल अशी कोणीच कल्पनाही केली नव्हती.
8 / 10
रामायणावर आधारित सिनेमा केवळ भारतातच नाही तर जपानमध्येही बनला होता. 'रामायण द लीजेंड ऑफ प्रिंस रामा' ही अॅनिमिटेड फिल्म आली. फिल्ममेकर यूगो साको पहिल्यांदा भारतात आले तेव्हा त्यांना रामायणाबद्दल समजलं आणि त्यांनी जपानी भाषेत रामायण निर्मितीचा विचार केला.
9 / 10
1990 मध्ये या सिनेमाच्या निर्मितीला सुरुवात झाली. मात्र विश्व हिंदू परिषदेने सिनेमाला अॅनिमेशनमध्ये बनवण्याचा विरोध केला. रामायणाला कार्टुनरुपात दाखवणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र युगो साको यांनी कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत असा विश्वास दिला. अरुण गोविल यांनीच सिनेमाच्या हिंदी डबिंगमध्ये रामाच्या भूमिकेला आवाज दिला होता.
10 / 10
1992 साली जेव्हा सिनेमा रिलीज होणारच होता तेव्हा बाबरी मस्जिदचा वाद उफाळला आणि सिनेमा भारतात रिलीज होऊ शकला नाही. यानंतर सिनेमा कार्टुन नेटवर्कवर प्रदर्शित झाला.
टॅग्स :रामायणसिनेमाजपानभारत