"लग्नापूर्वी २ वर्ष 'लिव्ह-इन'मध्ये राहिलो, कारण..." सिद्धार्थ बोडके-तितीक्षा तावडेनं केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 10:46 IST
1 / 10अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे आहे. या दोघांचा मोठा चाहतावर्ग असून ही जोडी कायम चर्चेत असते. 2 / 10पण तुम्हाला माहिती आहे का? या दोघांनी लग्न करण्यापुर्वी दोन वर्ष एकत्र राहण्याचा, म्हणजेच 'लिव्ह-इन रिलेशनशिप'चा धाडसी निर्णय घेतला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या जोडीने याबद्दल खुलासा केलाय.3 / 10तितीक्षा व सिद्धार्थ हे फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. आता पुढच्या महिन्यात त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होईल. पण, लग्नापुर्वी हे दोन वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिले. 4 / 10अनेकदा लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला जातो, पण तितीक्षाच्या बाबतीत हे फारच नैसर्गिकरित्या घडलं. 'अनुरूप विवाह संस्थेला'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तितीक्षा व सिद्धार्थ यांनी याबद्दल खुलासा केलाय.5 / 10तितीक्षाने आपण लिव्ह-इनमध्ये राहण्यास कशी सुरुवात केली, याचा मजेशीर किस्सा सांगितला. ती म्हणाली, 'माझी बहीण खुशबूचे सासू-सासरे घरी येणार होते, तेव्हा मी काही दिवसांसाठी सिद्धार्थच्या घरी राहायला गेले. आधी एक बॅग नेली, मग दुसरी... आणि हळूहळू मी तिथेच शिफ्ट झाले. असं करत आम्ही दोन वर्ष लग्नापूर्वी एकत्र राहिलो'.6 / 10तितीक्षा व सिद्धार्थ या दोघांच्याही पालकांना लिव्ह-इनबद्दल माहिती होतं. उलट सिद्धार्थच्या कामाबद्दल तितीक्षाच्या पालकांना खूप आदर होता. घरच्यांनी कोणताही आक्षेप न घेता त्यांच्या या निर्णयाचा स्वीकार केला. तितीक्षा म्हणाली, 'महत्त्वाचं म्हणजे आम्ही दोघेही वयाने असे खूप लहान नव्हतो. आम्ही दोघेही खूप समजूतदार होतो. आम्ही जे करतोय ते लग्नाच्या दृष्टीनेच करतोय हे दोघांच्याही पालकांना माहीत होतं'.7 / 10तितीक्षा व सिद्धार्थ यांनी त्यांच्या लिव्ह-इनमध्ये राहिल्याचा काय फायदा झाला, याबद्दलही सांगितलं. तितीक्षा म्हणाली, 'दोन वर्ष आम्ही एकत्र राहत होतो, त्यामुळे त्या काळातच आमच्यातल्या या गोष्टींवर आम्ही काम केलं. एकत्र राहत असल्याने एकमेकांच्या स्वभावाबद्दल माहीत झालेलं. एकमेकांना काय आवडतं, काय नाही आवडत याबद्दलही माहीत झालेलं. आम्ही दोघेही खूप व्यक्त होणारी माणसं आहोत, त्यामुळे दररोजच्या बोलण्यातूनच या गोष्टी एकमेकांना कळायच्या'. 8 / 10सिद्धार्थच्या मते, दोन वर्ष एकत्र राहिल्यामुळे त्यांना एकमेकांच्या आवडीनिवडी आणि स्वभावाचे पैलू नीट समजले. तो म्हणाला, 'आमच्यात संवाद खूप स्पष्ट आहे. एकमेकांना काही आवडलं नाही तर आम्ही लगेच बोलून दाखवतो. त्या दोन वर्षांत सर्व गोष्टी समजून घेतल्या'.9 / 10अनेकदा लग्नासाठी घरचे मागे लागतात, पण या जोडीच्या बाबतीत उलट घडलं. सिद्धार्थने मुलाखतीत सांगितलं की, लिव्ह-इनमध्ये असतानाच त्यांनीच घरी लग्न करण्याबद्दल सांगितलं. तितीक्षा व सिद्धार्थनेच पुढाकार घेत लग्नाची तारीख ठरवली. तितीक्षा त्याबद्दल म्हणाली की, 'आम्हीच एकत्र बसून लग्नाची तारीख काढली, मग त्या दिवशी मुहूर्त आहे का पाहिला आणि लग्न केलं इतकं सोप्या पद्धतीने सगळं झालं'.10 / 10दरम्यान, तितीक्षा आणि सिद्धार्थची पहिली भेट 'झी मराठी'वरील 'कन्यादान' मालिकेच्या सेटवर झाली होती. तेव्हा ते सहाय्यक भूमिकेत होते. पुढे 'तू अशी जवळी रहा' मालिकेत मुख्य भूमिकेत एकत्र काम करताना त्यांची मैत्री घट्ट झाली. सिद्धार्थने सांगितले की, कोविडच्या काळात एकमेकांपासून दूर असताना त्यांना आपण एकमेकांच्या प्रेमात असल्याची जाणीव झाली.