Join us

​बॉलीवुडकरांचा मराठी बाणा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 16:03 IST

दाक्षिणात्य किंवा हॉलीवुडच्या सिनेमांवरुन बॉलीवुडचे सिनेमा बनतात हे सा-यांनाच माहितीय. सध्या तर बॉलीवुडमध्ये दाक्षिणात्य सिनेमांचा हिंदी रिमेक करण्याचा ट्रेंड ...

दाक्षिणात्य किंवा हॉलीवुडच्या सिनेमांवरुन बॉलीवुडचे सिनेमा बनतात हे सा-यांनाच माहितीय. सध्या तर बॉलीवुडमध्ये दाक्षिणात्य सिनेमांचा हिंदी रिमेक करण्याचा ट्रेंड सुरु आहे.दाक्षिणात्य भाषेतील सिनेमा एकामागून एक हिंदीत येत आहेत.आता याच धर्तीवर बॉलीवुडकरांना आता मराठी सिनेमांनी मोहिनी घालण्यास सुरुवात केलीय. नुकतंच 'दे धक्का' या गाजलेल्या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक करणार असल्याची घोषणा महेश मांजरेकर यांनी केलीय. या रिमेक सिनेमात अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी साकारलेली भूमिका संजय दत्त करणार असल्याच्या चर्चा आहेत.मराठीतून हिंदी रिमेक होणारा 'दे धक्का' हा काही पहिला सिनेमा नाही. याआधीही बॉलीवुडकरांना मराठी सिनेमा आणि त्यातील कथेनं भुरळ घातलीय. आजच नाही तर अगदी काही वर्षांपासून हिंदी सिनेमावाल्यांना मराठीतील आशयघन आणि वैविध्यपूर्ण कथेची भुरळ पडलीय.यांत प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल पाठलाग, मुंबईचा जावई, दाम करी काम, पिंजरा, झपाटलेला, माझा छकुला, लालबाग परळ या मराठी सिनेमांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. मराठीत गाजलेल्या 'पाठलाग' रिमेक करण्यात आलेला 'मेरा साया' हा हिंदी सिनेमा तुफान हिट ठरला. 'मुंबईचा जावई' या मराठी सिनेमाचा 'पिया का घर' हा हिंदी रिमेक तर ‘दाम करी काम’ या मराठी सिनेमाचा ‘पैसा पैसा पैसा’ हा हिंदी रिमेक करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या 'पिंजरा' या सिनेमाचा हिंदी रिमेकसुद्धा त्याच नावाने व्ही. शांताराम यांनी आणला होता.याशिवाय महेश कोठारेंच्या 'झपाटलेला' या सिनेमाचा 'खिलौना बना खलनायक' हा हिंदी रिमेक बनवण्यात आला.त्यानंतर 'माझा छकुला' या मराठी सिनेमाचा 'मासूम' हा हिंदी रिमेकही रसिकांनी अक्षरक्षा डोक्यावर घेतला.वर्षभरापूर्वी आलेल्या 'लालबाग-परळ' या सिनेमाचाही त्याच नावाने साकारण्यात आला हिंदी रिमेक सिनेमा रसिकांना भावला होता.आगामी काळात तर 'दे धक्का' या मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकप्रमाणे अनेक गाजलेल्या मराठी सिनेमांचा हिंदी रिमेक बनणार आहे. बॉलीवुडचे आघाडीचे कलाकार आणि दिग्दर्शकांना मराठीतील या सिनेमांचा विषय आणि कथेनं चांगलंच आकर्षित केलंय. यांत सगळ्यात पहिलं नाव येतं ते अभिनेता सलमान खानचं.मराठीत सुपरहिट ठरलेल्या 'शिक्षणाचा आयचा घो' आणि 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या गाजलेल्या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक करण्याची तयारी दर्शवलीय. बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमार यालाही महेश मांजरेकर यांच्या 'शिक्षणाचा आयचा घो' या सिनेमाच्या कथेनं आकर्षित केलंय. सलमाननं या सिनेमाचा हिंदी रिमेक केला नाही तर अक्की हा रिमेक करण्यासाठी तयार आहे.'नटरंग' या सिनेमानंही बॉलीवुडकरांवर जादू केलीय. या सिनेमाचं कथानक आणि गाणी बड्या निर्मात्यांना भावलीत. त्यामुळं नटरंग हिंदीत रिमेक करण्याचं काही निर्मात्यांनी ठरवलंय. नटरंगमध्ये अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी साकारलेली गुणा कागलकर ही भूमिका हिंदीत अभिनेता रणबीर कपूर साकारणार असल्याचे बोललं जातंय. या हिंदी सिनेमाचं संगीतही अजय-अतुल यांचंच असणार आहे.याशिवाय 'मुंबई-पुणे-मुंबई' या मराठी सिनेमाचाही 'मुंबई-दिल्ली-मुंबई' या नावाने हिंदी रिमेक बनणार आहे. मूळ मराठी सिनेमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे हेच या हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. अभिनेता शाहिद कपूर या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे. मराठी सिनेसृष्टीत सुपरहिट ठरलेला आणखी एक सिनेमा म्हणजे नटसम्राट. अभिनेता नाना पाटेकर यांच्या अभिनयाने नटलेल्या या सिनेमाची दखल बॉलीवुडकरांनाही घ्यावी लागलीय. नटसम्राट या सिनेमाचाही हिंदी रिमेक लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमातील अभिनेता नाना पाटेकर यांच्या अभिनयाची भरभरून प्रशंसा करणारे महानायक बिग बी अमिताभ बच्चन नटसम्राटच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा आहेत.मराठीत काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'येड्यांची जत्रा' या सिनेमाचाही हिंदी रिमेक बनणार आहे.या हिंदी रिमेकसाठी परेश रावल, विनय पाठक, सौरभ शुक्ला, राजपाल यादव आणि संजय मिश्रा या कलाकारांशी दिग्दर्शकाची बोलणी सुरु असल्याचं समजतंय.मराठीत सध्या अनेक दर्जेदार सिनेमा रसिकांच्या भेटीला येतायत.मराठी रसिकही या सिनेमांना डोक्यावर घेतायत.यांत ताजं उदाहरण म्हणजे सैराट, लय भारी, बालक-पालक, टीपी आणि यासारखे आणखी बरेच मराठी सिनेमा. त्यामुळं आगामी काळात या गाजलेल्या मराठी सिनेमांचाही हिंदी रिमेक बनल्यास आश्चर्य वाटायला नको.