सैराट या चित्रपटाच्या पटकथेवरून झालेला वाद
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला वेड लावले. या चित्रपटाच्या कथेची जागतिक पातळीवरदेखील प्रशंसा करण्यात आली होती. मात्र, या चित्रपटाच्या पटकथेवरून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. नवनाथ माने यांच्या बोभाटा या कादंबरीवरुन सैराटची कथा, पटकथा लिहिली असल्याचा दावा या कादंबरीच्या लेखकाने केला होता. याबाबत त्यांनी स्वामित्व हक्क भंग केल्याप्रकरणी पनवेल येथील न्यायालयात याचिकादेखील दाखल केली होती. सैराटच्या या प्रसिद्धीच्या मार्गातील हा वाद चांगलाच गाजला होता.
नेहा महाजनच्या न्युडसीनची चर्चा
नेहा महाजन तामिळ सिनेमातील तिच्या एका लीक झालेल्या व्हिडिओमुळे यावर्षी चर्चेत आली होती. ''छायम पोसिया वीडू'' या तामिळ सिनेमासाठी नेहाने न्यूड सीन्स दिले होते. या सीन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या सिनेमातील एक दोन नव्हे तर तीन व्हिडिओ व्हायरल झाले होते. एका व्हिडिओत तिच्या या न्यूड सीन्सविषयी सोशलमीडियावर बरीच टीका करण्यात आली होती. तसेच या न्यूड सीन्सविषयी खुलासा करताना नेहा म्हणाली होती की, चित्रपटाच्या कथेला या सीन्स गरज असल्यामुळे हे सीन्स मी दिले आहे. या न्यूड सीन्सविषयी माझ्या परिवाराशी मी चर्चा केली होती. मात्र तिचा हा वाददेखील बराच चर्चेत होता.
हे राम नथुराम नाटकाच्या प्रयोगाला विरोध
हे राम नथुराम नाटकाच्या प्रयोगाला कोल्हापुरामध्ये विरोध करण्यात आला होता. या प्रयोगाला स्वाभिमानी संघटनेने विरोध दर्शविला होता. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे यांचे हे नाटक आहे. नितेश राणेंची स्वाभिमानी संघटना आणि संभाजी ब्रिगेडने कोल्हापुरात होणारा प्रयोग बंद पाडण्याचा इशारा दिला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाºयास या नाटकामध्ये देशभक्त दाखविण्यात आले आहे. त्यामुळे या नाटकाचा प्रयोग कोल्हापुरच्या थिएटरमध्ये कदापी होऊ देणार नाही, असा पवित्रा स्वाभिमानी आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांनी घेतला होता. तसेच काही दिवसांपूर्वी पुणे येथेदेखील या नाटकाला विरोध करण्यात आला होता.
सैराट हा चित्रपट संस्कृतीला घातक असल्याची चर्चा
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट मराठी चित्रपटाने अक्षरश: राज्याक धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील गाणी, कलाकारांच्या प्रेमात संपूर्ण राज्यच पडले असल्याचे पाहायला मिळाले. मात्र हा चित्रपट संस्कृतीला घातक असल्याचे देखील तेव्हा चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे सैराट चित्रपटापूर्वी जग सुंदर होत का? असा सवाल उपस्थित करत सैराटमुळे बलात्काराच्या घटना होत असतील, तर या चित्रपटासह मला फाशीवर चढवा, अशी संतप्त प्रतिक्रिया सैराट चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने एका कार्यक्रमात दिली होती. यावेळी त्याने सैराट चित्रपट हा महिला प्रधान असल्याचे देखील सांगितले होते.
नाटयगृहांची बिकट परिस्थिती
कलाकारांसाठी रंगभूमी ही आयुष्यातील खूप महत्वाची जागा असते. कारण त्यांना आपली कला सादर करण्याची संधी याठिकाणी मिळत असते. अक्षरश: कलाकार हे रंगभूमीला अगदी मनापासून पूजत असतात. अशा या महत्वाच्या जागेची दुरअवस्था पाहिली तर साहजिकच कोणी ही चिडणार. अशाच एका प्रसंगाला अभिनेता सुमीत राघवनला सामोरे जावे लागले. नुकतेच एका प्रयोगाच्या निमित्ताने डोंबिवलीतील सावित्रीबाई नाटयगृहात तो गेला होता. तेथील अतिथी कक्षामध्ये तो बसला होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी चिन्मयीदेखील होती. या प्रयोगावेळी त्याला नाटयगृहात किती गैरसोई जाणविल्या याचा एक व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावर शेअर केला होता. त्याच्या या व्हिडीओमुळे नाटयगृहांची बिकट परिस्थितीचा प्रश्न पुन्हा उभारला गेला. तसेच मराठी चित्रपटसृष्ट्रीतील अनेक कलाकारांनी नाटयृहांच्या बिकट परिस्थितीविषयी संतप्त प्रतिक्रि़या व्यक्त केल्या होत्या.