'शर्मिली' चित्रपटात कामिनी आणि कांचन या दोन जुळ्या बहिणींची भूमिका राखी गुलजार यांनी अजरामर केली. शशी कपूर एका बहिणीच्या प्रेमात पडतो आणि त्याला कळते की, तो दुसर्या बहिणीशीच लग्न करतो आहे. त्यांच्या चेहर्यांमधील वेगळेपणामुळे हे सारे घडते आहे हे त्याला कळून चुकते. या चित्रपटातील राखीचा अभिनय अतिशय भावस्पश्री होता.
हेमा मालिनी
दिलीप कुमारच्या 'राम और श्याम' ची प्रेरणा घेऊन हेमा मालिनीचा 'सीता और गीता' हा चित्रपट आला. हेमा मालिनीच्या करिअरमधील हा चित्रपट तिच्या सर्वांत आवडीचा चित्रपट आहे. गीता एकदम बिनधास्त तर सीता शांत, सुस्वभावी स्वभावाची असते. गीताच्या येण्यामुळे कॉमेडीला सुरुवात होऊन सीतावरील सर्व अत्याचार संपतात, असे या चित्रपटात दाखविण्यात आले होते.
श्रीदेवी
'खुदा गवाह', 'लम्हे' आणि 'चालबाज' यासारख्या चित्रपटांमध्ये श्रीदेवीने दुहेरी भूमिका साकारली आहे. 'सीता और गीता' या हेमामालिनीच्या चित्रपटाची प्रेरणा घेऊन श्रीदेवीने तिने साकारलेल्या भूमिकांनाही न्याय दिला. तिने यात मंजू नावाच्या डान्सरचा अभिनय केला असून श्रीमंत सुरज (सनी देओल) च्या प्रेमात पडते. दुसरीकडे अंजू तिच्या काकाच्या जाचातून सुटते आणि मंजू तिला घरी घेऊन येते. दोघी जुळ्या बहिणी शेवटी एकत्र येतात.
माधुरी दीक्षित
'संगीत' आणि 'आँसू बने अंगारे' या चित्रपटात माधुरी दीक्षित हिने डबल रोल साकारला आहे. 'आँसू बने अंगारे'मध्ये ती आई आणि मुलीची भूमिका साकारते. तिची आई आणि दीर यांच्याविरोधात ती लढा देते. रवी (जितेंद्र) सोबत होणार्या लग्नात बाधा येऊ नये यासाठी प्रयत्न करते. तिच्यावर होत असलेल्या अन्यायाला ती विरोध करते.
काजोल
दुश्मन चित्रपटांत काजोलने अतिशय उत्कृष्ट अभिनयाचे सादरीकरण केले आहे. तनुजा चंद्रा यांच्या या चित्रपटात तिने सोनिया आणि नैना या जुळ्या बहिणींची भूमिका साकारली आहे. सोनियावर झालेल्या बलात्काराचा बदला तिची बहीण नैना घेते. या चित्रपटासाठी काजोलला स्टार स्क्रिन अँवॉर्ड फॉर बेस्ट अँक्ट्रेस मिळाला.