अनुष्का शर्मा व विराट कोहली यांचे न्यू इयर सेलिब्रेशन सध्या खूप जोरात सुरू आहे अशा बातम्या आल्या होत्या. आता त्यात आणखी एक भर पडली आहे. दोघांच्या उपस्थिती एका गुप्त कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून हा कार्यक्रम दोघांचा साखरपुडा असणार आहे असेही समजते. टिहरी येथील एका हॉटेलमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा साखरपुडा होणार असून या कार्यक्रमाला उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिष रावत, अमिताभ बच्चन व त्यांचे कुटुंबिय व अंबानी कुटुंबिय हजर राहणार असल्याचे समजते.
बच्चन आणि अंबानी परिवार डेहराडूनला पोहोचले असून एका हॉटेलमध्ये विराट आणि अनुष्काच्या साखरपुड्याच्या विधीला ते हजर राहणार असल्याचे सांगितले जाते. मात्र अधिकृतरित्या याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ऋषीकेशमध्ये मीडियापासून चार हात लांब राहत सुट्टीचा आनंद लुटत होते. त्यानंतर दोघे डेहराडूनला पोहोचले आहेत. विराट हा उत्तराखंडचा ब्रँड अम्बॅसेडर आहे. अनुष्काचे उत्तराखंडशी वेगळेच नाते आहे. अनुष्का सैनिकाची मुलगी असून तिची आई अशिमा शमार्चे गाव उत्तराखंडातील गढवाल हे आहे. तिचे नातेवाईक आणि जवळचे लोक डेहराडूनमध्येच राहतात. त्यामुळे त्यांचा साखरपुडा डेहराडूनमध्ये नव्या वर्षाच्या स्वागतासह पार पडणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
२०१६ हे वर्ष अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासाठी यशस्वी ठरले आहे. ‘सुल्तान’ आणि ‘ऐ दिल हैं मुश्किल’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाला चाहत्यांसोबत समीक्षकांनीही कौतुकाची थाप दिली. सध्या ती शाहरूख खानसोबत ‘रहनुमा’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली याच्या आगामी चित्रपटासाठी शाहरुखसोबत काम करताना मजा येतेय. सेटवर शाहरुखसोबत फिलॉसॉफिकल पातळीवर जाऊन आम्ही एकमेकांचे आयुष्य शेअर करतो, असे ती सांगते.