हृतिक रोशन
अभिनेता हृतिक रोशन याने जेव्हा बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती, तेव्हा अनेक दिग्गजांना घाम फोडला होता. सैफ अली खानने तर जाहीरपणे ही बाब बोलूनही दाखविली होती. हृतिकच्या बॉलिवूड एंट्रीचे गुण वैशिष्ट्ये म्हणजे त्याचा डान्स होय. ‘कहो ना प्यार है’मधून डेब्यू केलेल्या हृतिकच्या डान्सने तरुणाईला वेड लावले होते. पुढे ‘बॅँग बॅँग’, ‘धूम-२’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटांमध्ये त्याने डान्सच्या अशा काही मूव्ज दाखविल्या की, सगळेच त्याच्या प्रेमात पडले.
वरुण धवन
वरुण धवन याने आपल्यातील डान्सिंग स्किल्सची झलक पहिल्याच ‘स्टूडेंट आॅफ द इयर’ या चित्रपटात दाखविली. ‘डिस्को सॉँग’ जर तुम्हाला आठवत असेल तर वरुणचा डान्सचा तडका लक्षात येईल. त्यानंतर त्याने ‘मै तेरा हिरो’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटांमध्येही असाच काहीसा डान्सचा तडका लावला. पुढे ‘एबीसीडी-२’ या डान्सवर आधारित चित्रपटाने वरुण हादेखील बॉलिवूडचा डान्सिंग किंग आहे, हे सिद्ध केले.
रणवीर सिंग
‘बाजीराव मस्तानी’ या सुपरहिट चित्रपटात रणबीर सिंगने डान्स करताना आपल्यात जबरदस्त एनर्जी असल्याचे दाखवून दिले. ‘मल्हारी’ या गाण्यावर रणवीरच्या मुव्ज बघण्यासारख्या आहेत. आजही या गाण्याचे बोल कानावर पडल्यास रणवीरची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
शाहिद कपूर
शाहिद कपूरमधील डान्सिंग स्किलविषयी कदाचित सगळ्यांनाच माहिती असेल. कारण शाहिद एक ट्रेन डान्सर असून, अभिनेता म्हणून काम करण्याअगोदर तो ज्यूनिअर आर्टिस्ट म्हणून कलाकारांच्या मागे डान्स करीत होता. आज तो बॉलिवूडचा स्टार अभिनेता आहे. ‘गुलाबो’, ‘जब वी मेट’मधील ‘नगाडा’ या गाण्यामध्ये शाहिदचा डान्स बघण्यासारखा आहे.
सुशांत सिंग राजपूत
सुशांतही एक उत्कृष्ट डान्सर आहे, हे त्याने नुकत्याच रिलीज झालेल्या ‘राब्ता’ या चित्रपटातून दाखवून दिले. ‘मैं तेरा बॉयफ्रेंड’ या गाण्यात सुशांतने केलेला डान्स अनेकांना आश्चर्यचकीत करणारा आहे. त्याच्या डान्समधील प्रत्येक स्टेप्स उत्कृष्ट असून, त्याच्यातील डान्सचे गुण दर्शविणारे आहेत.
रणबीर कपूर
परफेक्ट म्युझिक आणि परफेक्ट बीट्सवर रणबीर कपूरच्या स्टेप्स परफेक्ट असतात. ‘बद्तमीज दिल’मध्ये रणबीरने केलेला डान्स हे त्याचेच उदाहरण आहे. शिवाय रणबीरचा डान्स उत्साह वाढविणारा असल्याने तरुणाईला आपसुकच थिरकण्यास भाग पाडतो. याचा जलवा त्याच्या आगामी ‘जग्गा जासूस’ याही चित्रपटातून बघण्यास मिळू शकतो.