आपल्या फेव्हरेट स्टारला भेटण्यासाठी चाहत्यांनी रजनीकांत यांना अक्षरश: घेराव घातला होता. चित्रपटाच्या शूटिंगसाठी रजनीकांत सध्या काळा चष्मा आणि टोपी घालून धारावीच्या झोपडपट्टीत फिरत आहेत. शूटिंगसाठी ते तब्बल ४० दिवस मुंबईत राहणार असल्याने, चाहत्यांसाठी रजनी सर यांना जवळून बघण्याची नामी संधीच चालून आली आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्याबरोबर अभिनेत्री हुमा कुरेशी आणि मराठी अभिनेत्री अंजली पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मात्र या दोघींपेक्षा रजनीकांत यांनाच अधिक सुरक्षा देण्यात आली असून, ते नेहमी बाउन्सरच्या घेरावात असतात.
चित्रपटाची कथा एक मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे चित्रपटाचे प्रॉडक्शन या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन आहेत की, चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टरचा गेटअप त्याच्या वयानुसार बदलला जावा. त्याचबरोबर चित्रपटाची शूटिंग रिअल लोकेशनवर केली जात आहे. सीएसटी, धारावी आणि ग्रांट रोड या भागात पुढील ४० दिवसांत शूटिंग केली जाणार आहे. चित्रपटाची शूटिंग अशा मुलावर आधारित आहे, जो गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवताच, गुन्हेगारी जगतातील बेताज बादशाह म्हणून समोर येतो.
दरम्यान, सध्या रजनी सर धारावीत शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्यांना बघण्यासाठी लोक तुफान गर्दी करीत आहेत. चित्रपटाचे मुंबईतील शूटिंगनंतर चेन्नई येथे शूटिंग केली जाणार आहे. रजनीकांत यांचा ‘कबाली’ हा चित्रपट गेल्यावर्षी रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर फारसा रिस्पॉँस मिळाला नव्हता. आता या चित्रपटातून रजनीकांत यांना प्रचंड अपेक्षा असल्याचे समजते.