२४ वर्षांची सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूत याच्याबरोबर रोमान्स करताना दिसेल. अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच सुशांत, अभिषेक आणि साराचा एक फोटो समोर आला होता. तसेच अभिषेकबरोबरचा केदारनाथ येथील साराचा फोटो बघून, ती या चित्रपटातून डेब्यू करणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
काही दिवसांपूर्वीच सैफने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना साराच्या अभिनय करिअरवर मोकळेपणाने मत व्यक्त केले होते. यावेळी सैफने म्हटले होते की, मला अजूनही समजले नाही की, साराने बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय का घेतला? तिने ज्या पद्धतीचे शिक्षण घेतले, त्यावरून ती न्यूयॉर्कला जाऊन चांगल्या पद्धतीने सेटल होऊ शकली असती. तिच्या अभिनयावर मला शंका नाही किंवा मी तिला दोषही देत नाही. परंतु एक पिता म्हणून विचार केल्यास कोणीच आपल्या पाल्याला अशा प्रोफेशनमध्ये जाण्याचा सल्ला देणार नाही, जे क्षेत्र अजिबातच स्टेबल नाही.
यावेळी सैफने असेही म्हटले होते की, ‘इंडस्ट्रीमध्ये नेहमीच दबावाखाली किंवा भयभीत वातावरणात जगावे लागते. कारण तुम्ही कितीही चांगले काम करीत असला तरी, तुम्ही याठिकाणी यशस्वी व्हालच याची शाश्वती नसते. त्यामुळे कुठलेही आई-वडील आपल्या मुलाला असे आयुष्य देण्याचा विचार करणार नाहीत. मात्र साराविषयी विचार केल्यास, ती तिच्या बॉलिवूड डेब्यूविषयी खूश असून, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ती जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे.