‘भाई’ या शब्दाचा प्रयोग
बॉलिवूडमध्ये ‘भाई’ या शब्दाचा अर्थ ‘बहिणीचा भाऊ’ असा होत नाही. तर 'भाई' हा शब्द गॅँगस्टरशी संबंधित वापरला जातो. आतापर्यंत अंडरवर्ल्डवर आधारित जितके सिनेमे येऊन गेले त्या सर्व सिनेमांमध्ये ‘भाई’ हे कॅरेक्टर प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षणाचे ठरले आहे. विशेष म्हणजे सिनेमातील हे सर्व भाई खलनायकाच्या भूमिकेत असतात; मात्र तरीदेखील ते प्रेक्षकांसाठी हिरोच असतात. प्रेक्षक या सिनेमांवर एवढे भावून जातात की, अशा गॅँगवॉर सिनेमांवर दुसरा भाग बनविला जात आहे. जसे की, २०१० मध्ये ‘वन्स अपॉन ए टाइम’ हा सिनेमा आला होता, पुढे २०१३ मध्ये या सिनेमाचा दुसरा भाग म्हणजेच ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’ हा सिनेमा काढण्यात आला. तसाच प्रकार ‘डॉन’ या सिनेमाबाबत घडला. अमिताभच्या डॉननंतर शाहरूखने ‘डॉन’ साकारून प्रेक्षकांच्या मनात खलनायकाला नायक केले.
शाहरूखचा ‘रईस’ (२०१७)
या सिनेमात अब्दुल लतीफ याची कथा दाखविण्यात येणार आहे. दारूबरोबरच अवैधरीत्या शस्त्रास्त्रांची तस्करी करणारा अब्दुल पुढे लतीफ गॅँगस्टर बनतो. गुन्हेगारीच्या साम्राज्यात स्वत:चा दबदबा निर्माण करणारा लतीफ गॅँगस्टर पोलिसांच्या रडारवर असतो; मात्र ज्या पद्धतीने या गॅँगस्टरला लोकांसमोर दाखविले गेले, त्यावरून तो सिनेमातील मुख्य हिरो आहे हे स्पष्टपणे अधोरेखित होते. सिनेमात शाहरूखबरोबर नवाजुद्दीन सिद्दिकीही लीड रोलमध्ये आहे. सिनेमा पूर्णपणे गुन्हेगारी जगताशी संबंधित आहे.
डी-डे (२०१३)
या सिनेमात ऋषी कपूर यांनी इकबाल सेठ ऊर्फ गोल्डमॅनची भूमिका अतिशय खुबीने साकारली. निखिल आडवानीच्या या सिनेमात इकबाल सेठ हा पाकिस्तानात राहणारा गॅँगस्टर भारतात दहशतवादी कारवायांना कशा पद्धतीने हाताळतो, हे दाखविण्यात आले. संपूर्ण सिनेमा अशाच एका आॅपरेशनवर आधारित आहे. ज्याद्वारे भारतीय काही गुप्तचर अधिकारी इकबालला किडनॅप करून भारतात आणू इच्छितात. सिनेमा कोणत्या गॅँगस्टरवर आधारित आहे, ते सरतेशेवटी प्रेक्षकांच्या लक्षात येते.
शूटआउट अॅट वडाला (२०१३)
मुंबई पोलिसांच्या पहिल्या एन्काउंटरचा बळी ठरलेला मन्या सुर्वे याच्या जीवनावर आधारित संजय गुप्ता यांनी ‘शूटआउट अॅट वडाला’ हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत आणला. सिनेमा रिलिज होण्याच्या सुरुवातीपासूनच मन्याच्या चांगुलपणाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. तो एक प्रामाणिक गॅँगस्टर होता, आज तो असता तर दाऊद संपला असता अशा चर्चा रंगल्या. काहींनी तर तो पहिला मराठी गॅँगस्टर असल्याच्याही अभिमानात्मक पोस्ट शेअर केल्या. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना भावणार हे जवळपास निश्चित होते. अगदी तसेच घडले. जॉन अब्राहम याने साकारलेली मन्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.
वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई (२०१०)
या सिनेमात हाजी मस्तान याच्या नेतृत्वाखाली मुंबईत संघटित झालेल्या गॅँग्सची कथा दाखविण्यात आली आहे. हाजी मस्तान १९६० ते १९७० च्या दशकात मुंबईमध्ये चांगलाच सक्रिय होता. दिग्दर्शक मिलन लुथरिया यांनी सिनेमात चांगलाच ड्रामा भरल्याने प्रेक्षकांना तो भावला. अजय देवगण याने हाजी मस्तानची भूमिका साकारली होती. तर इमरान हाश्मी याची भूमिका दाऊदशी मिळती-जुळती होती.
ब्लॅक फ्रायडे (२००७)
एस. हुसैन जैदी यांच्या पुस्तकावर आधारित ‘ब्लॅक फ्रायडे’ या सिनेमातून मुंबई अंडरवर्ल्ड आणि पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआय यांच्यातील संबंध दाखविण्यात आले. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा सिनेमा १९९३ च्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ज्यामध्ये बॉम्बस्फोटाच्या प्लॅनिंगपासूनची कथा दाखविली गेली. सिनेमातील पवन मल्होत्रा याची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली; मात्र कथेमुळे हा सिनेमा न्यायालयीन प्रक्रियेत अडकला. ज्यामुळे कित्येक वर्ष तो रिलिज होऊ शकला नाही.
कंपनी (२००२)
रामगोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ या सिनेमात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि छोटा राजन यांच्यातील नातेसंबंध दाखविण्यात आले आहे. सिनेमात अजय देवगण आणि विवेक ओबेरॉय यांनी गॅगस्टरची भूमिका साकारली आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असलेल्या दाऊदबरोबरचे संबंध याच प्रकरणानंतर छोटा राजनशी बिनसले होते. त्याच आशयाचा या सिनेमात समावेश करण्यात आला होता. प्रेक्षकांना तो चांगलाच भावला होता. आजही या सिनेमातील डायलॉग आणि गाणी प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
दगडी चाळ
दगडी चाळ आणि त्यात दडलेली अरूण गवळीची गुन्हेगारी दुनिया रु पेरी पडद्यावर उलगडण्यात आली. ‘दगडी चाळ’ या नावाने असलेल्या या सिनेमात मकरंद देशपांडे याने अरूण गवळी उर्फ डॅडीच्या भूमिकेत दिसला. डॅडी सिनेमाची कथा अरु ण गवळी आणि दाऊद इब्राहिमच्या अवतीभोवती फिरताना दिसली. त्याचबरोबर अरूण गवळी यांच्या त्याकाळातील गुन्हेगारी साम्राज्याचे वास्तवही या सिनेमातून दाखविण्यात आले. मात्र ज्या पद्धतीने सिनेमात डायलॉग दाखविण्यात आले त्यावरून गवळी स्टाईल ही प्रेक्षकांना चांगलीच भावल्याचे दिसून आले.