‘गुमनाम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची ही घटना आहे. जेव्हा चित्रपटातील सेकंड लीड अॅक्ट्रेस हेलेनने प्राण यांची थेट दिग्दर्शकांकडेच तक्रार केल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. असे काय घडले होते की, हेलेन एवढी संतापली होती. कारण तिने दिग्दर्शकांकडे अतिशय आरडाओरड करून प्राणची तक्रार केली होती.
त्याचे झाले असे की, चित्रपटातील एका गाण्याची शूटिंग स्विमिंग पूलमध्ये केली जात होती. जेव्हा शूटिंग संपत असे तेव्हा सर्व स्टार्स एकमेकांची चेष्टामस्करी करीत होती. अशीच काहीशी चेष्टा प्राण यांनी हेलेनची केली होती; मात्र तिला ही चेष्टा अजिबात पसंत आली नाही, तिने रागाच्या भरात प्राण यांना खडेबोल सुनावित थेट दिग्दर्शकांकडे तक्रार केली.
वास्तविक, शूटिंग संपल्यानंतर प्राण स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करीत होते. तेव्हा त्यांनी हेलेनचा हात पकडून तिलाही स्विमिंग पूलमध्ये ओढले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे हेलेन पाण्यात पडली. शिवाय तिला पोहता येत नसल्याने ती प्रचंड घाबरली होती. सुदैवाने पुलात पाणी कमी असल्याने कुठलीही अप्रिय घटना घडली नाही; मात्र या प्रकारामुळे हेलेन प्रचंड संतापली होती.
प्राण यांनी हेलेनच्या रागाकडे फारसे लक्ष दिले नाही, ते लगेचच नॉर्मल झाले. पहिल्यासारखेच ते हेलेनबरोबर बोलत होते; मात्र संतापलेल्या हेलेनचा कित्येक महिने राग शांत झाला नव्हता. पण, म्हणतात ना काळानुसार सगळंच काही बदलत असतं, असेच काहीसे हेलेनबाबतीत झाले. पुढे तिने प्राणबरोबरची आपली मैत्री कायम ठेवली.