गुजरातमधील सूरत जिल्ह्यातील अमरोली येथे २५ मार्च १९४८ साली त्यांचा जन्म झाला. मुस्लीम पिता मुस्तफा आणि पारशी आई फरीदा यांचे ते सुपुत्र. मुस्तफा हे मुंबईत वकिली करीत असत.
त्यांचे कुटुंब जमीनदार असल्याने अत्यंत श्रीमंतीमध्ये त्यांचे बालपण गेले. पाच अपत्यांपैकी ते सर्वात मोठे होते. मुंबईतील सेंट मेरी स्कूलमध्ये आणि नंतर सेंट झेव्हिअर कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. महाविद्यालयात सुनील गावस्कर हे त्यांचे सहकारी होते.
वडील वकील असल्याने साहजिकच त्यांना या पेशाकडे वळावे लागले. मात्र, यामध्ये त्यांना फारशी रुची नव्हती. त्यांचा अभिनयाकडे ओढा होता.
महाविद्यालयीन जीवनात रुपा जैन यांच्याशी त्यांची ओळख झाली. पुढे त्याचे लग्नात रुपांतर झाले. रुपा या शबाना आझमी यांच्या मैत्रीण होत्या.
इप्टा आणि इतर संस्थांशी ते सुरूवातीच्या काळात जोडले होते. १९७३ साली ते दिग्दर्शक सागर सरहदी यांच्या संपर्कात आले. ‘गरम हवा’ हा त्यांचा पहिला चित्रपट. यात त्यांनी सहकलाकाराची भूमिका निभावली होती. बलराज साहनी हे या चित्रपटाचे नायक होते. हिंदी कलात्मक सिनेमा म्हणून या चित्रपटाची ओळख होती.
सुरुवातीला त्यांना ७५० रुपये पगार होता. मुंबई दूरदर्शनवर त्यांनी अँकर म्हणून क्विझ शो चे संचलन केले. युवादर्शन आणि यंग वर्ल्ड या कार्यक्रमांमुळे ते घराघरात पोहोचले.
शतरंज के खिलाडी, नूरी, चष्मे बद्दूर, उमराव जान, बझार, साथ साथ, रंग बिरंगी, किसीसे ना कहना, बिवी हो तो एैसी या चित्रपटांमधून त्यांनी काम केले. दीप्ती नवल यांच्याशी त्यांची जोडी गाजली. शबाना आझमींसोबत लोरी, कल्पना लाजमींसोबत एक पल, मुझफ्फर अलींसमवेत अंजुमन आणि तुम्हारी अमृता या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. शबाना आझमींसोबत ‘तुम्हारी अमृता’ हे नाटक १२ वर्षे केले. सोनाली बेंद्रेसोबत ‘आपकी सोनिया’ हे नाटक केले.
सास बहू और सेन्सेक्स, लाहोर या चित्रपटांमधून त्यांनी काम केले. लाहोरसाठी त्यांना २०१० साली राष्टÑीय पुरस्कार मिळाला.
अहा, चमत्कार, जी मंत्रीजी, श्रीकांत, दो दिल एक जान अशा मालिकांमध्ये त्यांनी काम केले.
जिना इसीका नाम है ही त्यांची मालिका गाजली.
दुबईमध्ये आपल्या कुटुंबियासमवेत गेले असताना त्यांचे २७ डिसेंबर २०१३ रोजी निधन झाले.