मिस्टर परफेक्शनिस्टचे परफेक्ट प्लॅनिंग
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाºया आमिर खान याच्या ‘दंगल’ने सध्या सर्वत्र दंगल केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटावर मेहनत घेत असलेल्या आमिरची मेहनत प्रेक्षकांना भावली असल्याने त्याच्याकडे न्यू इयर सेलिब्रेशनचे निमित्त आहे. त्याचबरोबर २८ डिसेंबर रोजी त्याच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने न्यू इयरची पार्टी तिहेरी रंगत आणणारी ठरणार आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तो महाराष्टÑातील पंचगणी या निसर्गरम्य पर्यटनस्थळी संपूर्ण परिवारासोबत पोहचला आहे. न्यू इयर, लग्नाचा वाढदिवस आणि दंगलची सक्सेस पार्टी अशा तिहेरी अंदाजात तो नव्या वर्षाचे स्वागत करणार आहे.
सैफीनाचे स्पेशल सेलिब्रिशन
२०१६ हे वर्ष सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या आयुष्यात आनंददायी ठरले आहे. नुकताच करिनाने तैमूर नावाच्या एका गोंडस मुलाला जन्म दिल्याने कपूर आणि पतौडी कुटुंब हरकून गेले आहे. त्यामुळे त्यांचे न्यू इयर सेलिब्रिशन हे खास असेल यात शंका नाही. सैफीना नव्या वर्षाचे स्वागत मुंबईमध्येच करणार असून, यासाठी त्यांनी खास पार्टीचे आयोजन केले आहे. पार्टीत आणखी काही सेलिब्रिटी त्यांच्या आनंदात सहभागी होणार आहेत.
मुन्नाभाईचे विदेशात सेलिब्रेशन
बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्त याच्यासाठी हे वर्ष दिलासादायी ठरले असेच म्हणावे लागेल. कारण याचवर्षी तो शिक्षा भोगून बाहेर आला. त्यामुळे यंदाचे न्यू इयर सेलिब्रेशन त्याच्या व त्याच्या परिवारासाठी खूपच स्पेशल असेल यात शंका नाही. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तो त्याच्या परिवारासमवेत भारताबाहेर जाण्याचे प्लॅनिंग करीत आहे. मात्र तो कुठे जाणार याचा अद्यापपर्यंत खुलासा होऊ शकलेला नाही. काहीही असो एवढ्या वर्षानंतर मुन्नाभाई आपल्या परिवारासोबत नव्या वर्षाचे स्वागत करणार असल्याने त्याच्यासह त्याचे चाहतेही खूश आहेत.
जॅकलिनचे कोलंबो येथे सेलिब्रेशन
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आपल्या परिवारासोबतच न्यू इयर सेलिब्रेशन करणार आहे. यासाठी ती कोलंबो येथे पोहचली असून, परिवारासोबतच्या सेलिब्रेशनमुळे ती हरकून गेली आहे. श्रीलंकेच्या या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. कामानिमित्त ती कुटुंबापासून बराच काळ दूर असते. न्यू इयरनिमित्त तिला परिवारासोबत काहीकाळ व्यतित करण्याची संधी मिळाल्याने ती खूश आहे. तिचा संपूर्ण परिवार कोलंबो येथे पोहचला आहे.
राधिका आपटे पोहचली लंडनला
राधिका आपटे हिच्यासाठी २०१६ हे खरोखरच ‘धोक्याचं वरीस’ ठरलं आहे. चित्रपटातील जबरदस्त इंटिमेट सीन्समुळे ती जेवढी चर्चेत राहिली तेवढीच टीकेची धनीही ठरली. मात्र काहीही असो या चित्रपटांनी तिला नवी ओळख निर्माण करून दिली हेही तेवढेच खरे आहे. अशा चढउताराच्या या वर्षाला निरोप देण्यासाठी राधिका लंडन येथे पोहचली आहे. खरं तर राधिका लंडनला तिचे दुसरे घर समजते. संंपूर्ण परिवारासमवेत राधिका याठिकाणी नव्या वर्षाचे स्वागत करणार आहे.