अमरीश पुरी-राजीव पुरी
‘मोगॅम्बो खुश हुआ’ हा डायलॉग ऐकलं की डोळ्यासमोर ऐकच चेहरा येतो तो म्हणजे बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार आणि खलनायकाच्या भूमिकेला नवं परिमाण मिळवून देणारे अभिनेता अमरिश पुरी यांचा.आपला पहाडी आणि दमदार आवाज, तितकाच खास अभिनय याच्या जोरावर अमरीश पुरी यांनी अनेक खलनायकी भूमिका अजरामर केल्या आहेत. अमरीश पुरी यांचे पुत्र काय करतात असा सवाल प्रत्येकाच्या मनात असेल. त्यांच्या मुलाचे नाव राजीव पुरी असं आहे. राजीव हे चित्रपटसृष्टीत नसले तरी उद्योगपती म्हणून त्यांनी नाव कमावलं आहे.
अमजद खान-शादाब खान
कितने आदमें थे... शोले सिनेमातील गब्बर अर्थात अमजद खान यांनी खलनायक म्हणून रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवले आहे. त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका रसिकांच्या मनात घर करुन आहेत. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा शादाबने बॉलीवुडमध्ये एंट्री मारली. राजा की आयेगी बारात हा त्याचा पहिला सिनेमा. मात्र या सिनेमाला आणि पर्यायाने शादाबच्या फिल्मी करियरला अमजद खान यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळू शकली नाही.
अनुपम खेर-सिकंदर खेर
डॉक्टर डँग हा प्रत्येक सिनेप्रेमी रसिकाला लक्षात असेल. सशक्त अभिनयामुळे अभिनेता आणि खलनायक म्हणून डॉक्टर डँगची भूमिका साकारणा-या अनुपम खेर यांनी रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमातील त्यांच्या खलनायकी भूमिका रसिकांना भावल्या आहेत. आजही अनुपम खेर यांच्यातील कलाकार विविधरंगी भूमिका साकारत रसिकांचं मनोरंजन करत आहे. अनुपम खेर यांच्याप्रमाणेच त्यांच्या लेकाने अर्थात सिकंदर खेर यानेही अभिनयात आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. नुकतंच 24 सिरीजच्या सीझन टू मध्ये सिकंदर खेर वडिल अनुपम खेर यांच्यासोबत झळकला आहे.
गुलशन ग्रोव्हर-संजय ग्रोव्हर
बॉलीवुडचा बॅड मॅन कोण असं म्हटलं की रसिकांच्या ओठावर एकच नाव येते ते म्हणजे गुलशन ग्रोव्हर. गेली अनेक दशकं खलनायकी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. गुलशन ग्रोव्हर यांनी आपला लेक संजय ग्रोव्हरला मात्र बॉलीवुड आणि अभिनयापासून दूर ठेवले आहे. संजय हा प्रोग्रॅमिंग एंड बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन डायरेक्टर आहे.
नसिरुद्धीन शाह-विवान शाह
अभिनेता नसिरुद्धीन शाह यांनी अनेक खलनायकी भूमिका गाजवल्या आहेत. प्रत्येक भूमिकेला नसिरुद्धीन शाह यांनी दमदार अभिनयाने पुरेपूर न्याय दिला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा लेक विवान यानेही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. हॅप्पी न्यू इयर या सिनेमात विवान बॉलीवुडचा बादशाह शाहरुख खानसोबत रुपेरी पडद्यावर झळकला होता.
किरण कुमार-विकास कुमार
अभिनेता किरण कुमार यांनी विविध सिनेमात खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. खलनायकी भूमिकांमुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली आहे. किरण कुमार यांच्याप्रमाणेच त्यांचा लेक विकास कुमार यानेही अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका सीआयडीमध्ये विकास कुमार याने सीआयडी ऑफिसरची भूमिका साकारली होती. याशिवाय विविध मालिकांमध्येही तो झळकला आहे.
शक्ती कपूर-सिद्धार्थ कपूर
बॉलीवुडचा क्राईम मास्टर गो-गो म्हणजेच अभिनेता शक्ती कपूर. त्यांनी साकारलेल्या विविध खलनायकी भूमिका आजही रसिकांच्या मनात घर करुन आहेत. शक्ती कपूर यांच्या अभिनयाचा वारसा आता त्यांचा लेक सिद्धार्थ कपूर चालवतो आहे. बॉलीवुडच्या नव्या उगवत्या ता-यांमध्ये सिद्धार्थची गणना होते.