कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 19:24 IST
1 / 7बॉलिवूडमध्ये सध्या जॉली एलएलबी ३ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, जॉली एलएलबी २ हा चित्रपटही सुपरहिट झाला होता. तसेच या चित्रपटामधील पात्रं आणि संवाद खूप लोकप्रिय झाले होते. या चित्रपटातील दहशतवादी इक्बाल कादरी हे पात्रही प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहेत. मात्र जॉली एलएलबी २ या चित्रपटात इक्बाल कादरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं खूप कौतुक झालं होतं. पण त्याचं नाव मात्र फारसं कुणाला ठावूक नाही. तसेच तो सध्या काय करतो, याबाबतही फारशी माहिती नाही. 2 / 7तर जॉली एलएलबी २ चित्रपटामध्ये इक्बाल कादरीची भूमिका इनाम उल हक या अभिनेत्याने साकारली होती. मुळचा सहारनपूर येथील असलेल्या इनाम याने फिराक चित्रपटामधून पदार्पण केलं होतं. त्याने काही कार्यक्रमांसाठी लेखनही केलेलं आहे. २०१२ साली आलेल्या फिल्मिस्थान चित्रपटामधून त्याला खरी ओळख मिळाली होती. या चित्रपटात त्याने आफताब हे पात्र साकारले होते. मात्र या पात्रामुळे त्याच्यावर एक विशिष्ट्य शिक्का बसला होता. तसेच लोक त्याला पाकिस्तानमधून आलेला अभिनेता समजू लागले होते. त्यानंतर त्याला चित्रपट मिळणेही कमी झाले होते. त्यामुळेच एवढ्या वर्षांत त्याला १२-१३ चित्रपटच मिळाले आहेत. 3 / 7याबाबत इनामने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, लोक मला बोलवायचे, मग सांगायचे की, सर तुमच्या व्हिसाचा प्रॉब्लेम होईल. तेव्हा मी त्यांना सांगायचो की मुंबईत राहायला कुठे व्हिसा लागतो? माझं उत्तर ऐकून लोक अवाक् व्हायचे. तसे तुम्ही भारतीय आहात का? असं मला विचारायचे. मी भारतीय आहे हे सांगण्यासाठी मला पीआर करावा लागला होता. 4 / 7मी जी भूमिका केली होती ती चित्रपटातील एक पात्र होतं, हेही लोक लक्षात घेत नाहीत. मी ते पात्र एवढं चांगल्या पद्धतीने साकारलं होतं की, लोक मला पाकिस्तानी समजू लागले होते. मात्र ही बाब एक प्रकारचं कौतुकही आहे, असे ही त्याने सांगितले. 5 / 7इनामने त्यानंतर अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट ह्या चित्रपटामध्ये जनरलची भूमिका साकारली होती. त्यावरूनही माझ्यावर एक शिक्का बसला होता. तर जॉली एलएलबी २ चित्रपटात इनामने इक्बाल कादरीची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याचे खूप मीम व्हायरल झाले होते. 6 / 7याबाबत इनामने सांगितले की, मी गेल्या १२ वर्षांत मोजकेच चित्रपट केले आहेत. मी इथे रिकामी बसायला आलेलो नाही. मात्र मी टाइपकास्ट झालो होतो. त्यामुळे मी काम करणं बंद केलं होतं. त्यावेळी प्रत्येक जण माझ्याकडे पाकिस्तानी म्हणूनच पाहत होता, अशीही खंत त्याने व्यक्त केली. 7 / 7बरेच चित्रपट नाकारल्याने इनाम याला मुंबईत राहताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याने साधेपणात राहण्याचा मार्ग निवडला. आजही तो भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. तसेच मर्यादित खर्च करतो. इनाम आता द शूज आणि वेलकम टू जंगल चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.