'पंचायत' फेम अभिनेता आसिफ खानला काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तातडीने उपचार मिळाल्यामुळे आसिफ खानवरील धोका टळला. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत असून त्याला उत्तम प्रतिसादही देत आहे. रुग्णालयातून फोटो पोस्ट करत आसिफने त्याचे हेल्थ अपडेट चाहत्यांना दिले होते. आता पुन्हा त्याने पोस्ट शेअर केली आहे.
आसिफ खानने रुग्णालयातील बेडवरुन एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या हातात एक पुस्तक असल्याचं दिसत आहे. अभिनेत्याच्या हाताला सलाइन लावल्याचं दिसत आहे. त्याच्या हातात राहत इंदौरी यांचं 'मैं जिन्दा हूं' हे पुस्तक आहे. आसिफच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्यामुळे चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आसिफने सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने म्हटलं होतं की "गेल्या ३६ तासांपासून हे बघितल्यानंतर मला जाणवलं की आयुष्य खूप छोटं आहे. एक दिवसही आपण गृहित नाही घेतला पाहिजे. सगळं काही क्षणात बदलून जातं. जे काही तुमच्याकडे आहे त्यासाठी कृतज्ञ राहा. तुमच्यासाठी जास्त कोण महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा आणि त्यांना जपा. आयुष्य हे एक गिफ्ट आहे आणि आपल्याला ते मिळालं आहे". आसिफने मिर्झापूर, पाताल लोक यांसारख्य वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. पंचायतमधील त्याने साकारलेली दामादजी ही भूमिका गाजली होती. या वेब सीरिजमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.