Join us  

'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 10:14 AM

ओंकार भोजनेला प्रेक्षकांनी पहिल्यांदाच साडीत पाहिलं. त्याच्यासारख्या टॅलेंटेड कलाकारालाही साडी नेसवलीत असं म्हणत अनेकांनी निलेश साबळेंवर टीका केली.

'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या विनोदी कार्यक्रमातून निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने (Onkar Bhojane) पुन्हा आपल्या भेटीला आलेत. 'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी हा कार्यक्रम सुरु केला. तर ओंकार भोजनेला हास्यजत्राने खरी ओळख दिली. आता हे तिघंही नवीन कार्यक्रमातून धमाल करत आहेत. मात्र त्यांना सुरुवातीपासूनच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये ओंकार भोजने आणि भाऊ कदमला साडी नेसवण्यात आल्याने प्रेक्षक खूप चिडले होते. काय गरज होती ? असा संतप्त सवाल अनेकांनी केला. याला आता ओंकार भोजनेने नम्रपणे उत्तर दिलं आहे. 

ओंकार भोजनेला प्रेक्षकांनी पहिल्यांदाच साडीत पाहिलं. त्याच्यासारख्या टॅलेंटेड कलाकारालाही साडी नेसवलीत असं म्हणत अनेकांनी निलेश साबळेंवर टीका केली. या सर्व प्रकारावर ओंकार भोजनेने मीडिया टॉक मराठीला दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिलं आहे. तो म्हणतो, "मी कोकणातून येतो. आमच्याकडे लोककला आहेत. तिथे गरज म्हणून अशी पात्र साकारली जातात. आता प्रत्येक कलाकाराची आपापली वेगळी गरज आहे. बाईपण भारी देवाची टीम आली होती. मोठा मराठी सिनेमा ज्याने आपल्याला काहीतरी नवीन, वेगळं दिलं. त्यांचा तो आनंद साजरा करताना जर असा काही प्रयत्न करावा लागला तर तो चुकीचा नाही. ती मजाच आहे ना. वंदना  गुप्ते, सुकन्या मोने अशा दिग्गज अभिनेत्री तिथे होत्या. त्यांच्यासमोर आम्ही त्यांचे मुलं, नातवंडं असल्यासारखेच आहोत. त्यांना ते आवडणारच आहे. तसंच ते आपल्या मुलांसारखं समजून घेऊ शकलो तर तो प्रकार आणखी मजेशीर होऊ शकेल असं मला वाटतं."

"साडी नेसण्याच्या प्रश्नावरच जर आपण गुरफटून राहिलो तर आपल्याला त्याच्या पलीकडची बाजू लक्षात येणार नाही. ती तशीच राहील मग काही मजा येणार नाही. एखादी भूमिका मला कोणत्या कारणाने सादर करता येत नाही. तर माझं ते अख्खं कॅरेक्टर जातं जे माझं खूप नुकसान आहे. म्हणजे जे कॅरेक्टर माझ्या आजूबाजूला आहे पण ते मला करता येत नाही तर मग मजा नाही."

ओंकार भोजनेने काही वर्षांपूर्वीच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून एक्झिट घेतली. नंतर तो सिनेमा, नाटक याकडे वळला. आता तो पुन्हा 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेतानिलेश साबळेट्रोलसोशल मीडिया