Join us
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनीची जागा कोणीही घेणार नाही

By admin | Updated: October 26, 2016 04:46 IST

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अश्विनी सध्या काही नाटकांमध्ये काम करीत होत्या. तसेच, ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेत

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अश्विनी सध्या काही नाटकांमध्ये काम करीत होत्या. तसेच, ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेत रावणाची आई कैकसीची भूमिका साकारत होत्या. तिने या मालिकेचे चित्रीकरण २१ तारखेला केले आणि त्यानंतर त्यांच्या कार्यक्रमासाठी त्या पुण्याला गेल्या. दुसऱ्या दिवशी परत येऊन त्या चित्रीकरणाला पुन्हा रुजू होणार होत्या. पण, २२ तारखेला त्यांच्या निधनाची बातमी सगळ्यांना मिळाली. २३ तारखेला सेटवर न येता त्यांनी कायमचीच एक्झिट घेतली. गणपती बाप्पा मोरया या मालिकेच्या टीमला अश्विनी यांच्या जाण्याने चांगलाच धक्का बसला आहे. या मालिकेच्या सगळ्या टीमने मिळून यंदा सेटवर दिवाळी साजरी करायची नाही, असेच ठरवले आहे. तसेच, या मालिकेत अश्विनी यांची जागा कोणीही घेणार नसून त्या साकारत असलेल्या भूमिकेला निरोप देण्याचे प्रॉडक्शन टीम आणि वाहिनीने ठरवले आहे. गणपती बाप्पा मोरया या मालिकेच्या सेटवर दिवाळीत कंदील लावण्यात येतो तसेच रोषणाई करण्यात येते; पण या वर्षी या मालिकेच्या सेटवर दिवाळी साजरीच केली जाणार नाहीये. अश्विनी गेल्यानंतर ही दिवाळी साजरी करायची नाही, असा मालिकेच्या कलाकारांनी आणि संपूर्ण टीमने एकमताने निर्णय घेतला आहे. तसेच, या मालिकेत अश्विनी यांनी कैकसीची भूमिका एका उंचीवर नेवून ठेवली आहे. त्या इमेजला कोणताही धक्का पोहोचू नये, यासाठी कैकसीची भूमिका मालिकेत यापुढे दाखवलीच जाणार नाही. कैकसीमाता भूतलावर निघून गेल्या आहेत, असे मालिकेत दाखविण्यात येईल. खरे तर कथानकानुसार या व्यक्तिरेखेचा शेवट काही महिन्यांनी होणार होता; पण आता कथानक बदलण्यात आले आहे.