Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अशोकसारखा नवरा मिळणं हे गेल्या जन्मीचं पुण्य...", निवेदिता सराफ यांनी व्यक्त केल्या भावना

By कोमल खांबे | Updated: March 21, 2025 12:07 IST

निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्यासारखा नवरा मिळणं हे भाग्य असल्याचं म्हटलं.

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. गेली कित्येक वर्ष ते दोघेही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अनेक सिनेमांमध्येही ते एकत्र काम करताना दिसले. ही जोडी प्रेक्षकांची लाडकी आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्यासारखा नवरा मिळणं हे भाग्य असल्याचं म्हटलं. 

निवेदिता सराफ यांनी मराठी बॉक्स ऑफिसला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "मला असं वाटतं की गेल्या जन्मी काहीतरी पुण्यकर्म केलं होतं म्हणून मला अशोक सराफांसारखा नवरा आणि सासर मिळालं. कारण, आपल्या देशांमध्ये लग्न हे दोन व्यक्तींमध्ये नाही तर दोन कुटुंबांमध्ये होतं. त्यामुळे लग्न म्हणजे दोन कुटुंबांच एकत्र येणं असतं. जेव्हा माझे सासरे होते तेव्हा अशोक मला जोरात हाक मारायची पण हिंमत करू शकत नव्हते". 

"ते त्यांना नेहमी म्हणायचे की मी तुझ्या आईशी असं वागताना कधी पाहिलं आहेस का? दुर्देवाने माझे वडील आणि सासरे दोघंही खूप लवकर गेले. त्यामुळे त्यांचा फार सहवास मला मिळाला नाही. पण, माझ्या नणंदा...माझी मोठी नणंद अमेरिकेला असते त्या तिथेही माझी मालिका बघत आहेत. माझी दुसरी नणंद अजूनही माझं काम बघतात आणि त्या सगळ्यांनाच माझ्या कामाबद्दल फार कौतुकही आहे", असंही पुढे निवेदिता सराफ म्हणाल्या. 

दरम्यान, सध्या अशोक सराफ आणि निवेदिता सराफ टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. निवेदिता सराफ या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तर अशोक सराफ कलर्स वाहिनीवरील 'अशोक मा.मा.' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत.  

टॅग्स :निवेदिता सराफअशोक सराफसेलिब्रिटी