Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही नेटफ्लिक्स बघताय की नेटफ्लिक्स तुम्हाला? युझर्सच्या खासगी आयुष्यात डोकावल्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 17:19 IST

जगभरातील लाखो लोकांसाठी मनोरंजनाचे साधन असलेले नेटफ्लिक्स गंभीर आरोपांच्या विळख्यात सापडले आहे.

Netflix: आजच्या डिजिटल जगात करमणुकीसाठी नेटफ्लिक्स पाहणे हा अनेकांच्या दिनचर्येचा भाग आहे. मात्र, आता हेच लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म एका मोठ्या कायदेशीर पेचात अडकले आहे. जेव्हा तुम्ही नेटफ्लिक्स बघता, तेव्हा नेटफ्लिक्स तुम्हाला बघत असते, अशा खळबळजनक ओळींसह अमेरिकेतील टेक्सास राज्याने या कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे.

नेमका आरोप काय?

टेक्सासचे अटॉर्नी जनरल केन पॅक्सटन यांच्या तक्रारीनुसार, नेटफ्लिक्स आपल्या युझर्सच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत असल्याचा आरोप आहे. कंपनी युझर्सची परवानगी न घेता त्यांचा डेटा गोळा करते आणि तो डेटा अशा प्रकारे वापरते की ज्यामुळे लोक, लहान मुले, तासनतास स्क्रीनला चिकटून राहतील.

'डार्क पॅटर्न'चा सापळा?

या खटल्यात डार्क पॅटर्न या तंत्रज्ञान क्षेत्रातील शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे. डार्क पॅटर्न म्हणजे अशा काही ट्रिक्स किंवा डिझाईन्स, ज्या युझर्सला नकळत एखाद्या गोष्टीची सवय लावतात. नेटफ्लिक्सच्या बाबतीत, त्यांचे पर्सनलाइज्ड रिकमेंडेशन हे युझर्सना सवय लावण्यासाठी वापरले जात असल्याचे म्हटले आहे. तुमच्या आवडीनुसार चित्रपट सुचवणे ही वरवर साधी गोष्ट वाटत असली, तरी त्यामागे युझर्सना प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडू न देण्याचे बिजनेस लॉजिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

युझर्सचे 'डिजिटल प्रोफाइल' तयार होतेय?

तक्रारीनुसार, तुम्ही कोणता सीन वारंवार पाहिला, कुठे व्हिडिओ पॉज केला, किती वेळ घालवला आणि कोणत्या वेळी नेटफ्लिक्स पाहिले, या सर्वांचा वापर करून कंपनी तुमचे एक डिजिटल प्रोफाइल तयार करते. याचा वापर करून कुटुंबांना आणि मुलांना स्क्रीनसमोर खिळवून ठेवले जाते, जेणेकरून त्या डेटाद्वारे कंपनीला मोठा नफा कमवता येईल.

नेटफ्लिक्सचे स्पष्टीकरण

दरम्यान, नेटफ्लिक्सने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा खटला चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर आधारित आहे. आम्ही युझर्सच्या प्रायव्हसीचा आदर करतो आणि जगभरातील डेटा सुरक्षा कायद्यांचे पालन करतो, असे कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

दरम्यान, आजवर डेटा ट्रॅकिंगबाबत केवळ फेसबुक किंवा यूट्यूबवर आरोप व्हायचे. मात्र, आता ओटीटी प्लॅटफॉर्मही या वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Netflix accused of spying on users, Texas files lawsuit.

Web Summary : Netflix faces lawsuit in Texas for allegedly tracking user activity without consent, using 'dark patterns' to keep them hooked, and creating digital profiles for profit. Netflix denies the allegations.
टॅग्स :नेटफ्लिक्सन्यायालय