Join us  

'पाकिस्तानी कलाकारांना भारतात संधी मिळायला हवी', लोकप्रिय अभिनेत्रीनं व्यक्त केली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 4:48 PM

पाकिस्तानी कलाकारांना भारतात पुन्हा काम द्यावं, अशी इच्छा लोकप्रिय अभिनेत्रीनं व्यक्त केली आहे.

चित्रपटसृष्टीतील एक नवाजलेल्या दिग्गज अभिनेत्री  मुमताज नुकतेच पाकिस्तानच्या दौऱ्यावरुन भारतात परतल्या आहेत. या दौऱ्याचे काही खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये राहत फतेह अली खान, फवाद खान यांसारख्या अनेक पाकिस्तानी कलाकारांसोबत त्या दिसून येत आहेत. पाकिस्तानमधून परतल्यानंतर यातच त्यांनी आता पाकिस्तानी कलाकारांना भारतात आमंत्रण देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

पाकिस्तानी स्टार्सवरील भारतातील बंदी हटवली पाहिजे, त्यांना इथे येऊन आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, मुमताज यांनी पाकिस्तान दौऱ्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाला, 'इतकं प्रेम पाहून मी भारावून गेले. मला माहित नव्हतं की तिथले लोक माझ्यावर एवढं प्रेम करतात. लोकंनी मला ओळखलं.  मी अजूनही तीच मुमताज असल्याची जाणीव झाली. ही देवाची कृपा आहे, दुसरं काही नाही'.

मुमताज म्हणाल्या,  'राहत फतेह अली खान आणि फवाद खान यांनी खूप छान स्वागत केलं. राहत फतेह अली खानची तब्येत बरी नव्हती, पण त्यांनी माझ्यासाठी खास गाणेही गायलं. तर फवाद खान हा आपल्या कुटुंबासह भेटायला आला होता'. पुढे मुमताज म्हणाल्या की, 'पाकिस्तानी कलाकारांना भारतात येऊन काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्याच्याकडे प्रतिभा आहे. मला विश्वास आहे की मुंबईत आपल्या चित्रपटसृष्टीत टॅलेंटची कमतरता नाही, पण त्यांनाही संधी मिळायला हवी', या शब्दात त्यांनी पाकिस्तानी कलाकारांवरी बंदी हटवण्याची इच्छा व्यक्त केली. 

२०१६ ला झालेल्या 'उरी' हल्ल्यात एकूण १९ भारतीय जवान शहीद झाले होते. याचा एक मोठा परिणाम झाला होता, तो म्हणजे पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगात काम करण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम दिले गेले नाही. त्यामुळे गेली अनेक काही वर्ष कोणत्याही भारतीय सिनेमात पाकिस्तानी कलाकार दिसत नाहीत. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी देणे म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाण आणि दोन देशांमधील संबंध सामान्य करणे म्हणून पाहिलं जातं.  

टॅग्स :मुमताजपाकिस्तानभारतसेलिब्रिटीफवाद खान