Join us  

इतना पैसा, बाप रे! 'डिस्को डान्सर' सिनेमाच्या कमाईचा आकडा पाहून मिथुनदा झाला होता अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 3:45 PM

'डिस्को डान्सर' सिनेमाची १२० मिलियनहून अधिक तिकिटे विकली गेली होती. १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणारा 'डिस्को डान्सर' हा पहिला भारतीय सिनेमा ठरला होता.

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन चित्रपटांपैकी एक म्हणजे 'डिस्को डान्सर'. १९८० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मिथुन चक्रवर्तींना रातोरात स्टार केलं होतं. या सिनेमातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली होती. 'आय एम अ डिस्को डान्सर'ची हुक स्टेपही आयकॉनिक ठरली होती. आजही कित्येक कार्यक्रमांत या पार्टी साँगवर चाहते थिरकताना दिसतात. मिथुन चक्रवर्तींच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. ८०सालात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवला होता. 

आजकाल बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमे १०० कोटींचा आकडा सहज पार करतात. पण, ८०-९०च्या दशकात बॉक्स ऑफिसवरील सिनेमांचं हे यश डोळे दिपवणारं होतं. त्यामुळेच 'डिस्को डान्सर' सिनेमाने १०० कोटींचा आकडा पार केल्यानंतर मिथुनदाही थक्क झाले होते. 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं होतं. "आताच्या काळात चित्रपटाने १०० कोटींपेक्षा कमी कमाई केली तर तो सिनेमा फ्लॉप ठरतो. पण, जेव्हा डिस्को डान्सर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवला होता तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता. 'इतना पैसा, बाप रे!' अशी माझी प्रतिक्रिया होती," असं ते म्हणाले होते. 

"एखाद्या प्रदेशात चित्रपटाने ३-४ कोटींचा गल्ला जमवला तरी तो सिनेमा ब्लॉकबस्टर मानला जायचा. कारण, जर तुम्ही सगळ्या प्रदेशांचे नंबर एकत्र केले तर हा आकडा ५०-५५ कोटींपर्यंत जायचा. पण, आजच्या काळात सिनेमाने १०० कोटींचा गल्ला जमवला नाही तर 'ठीक आहे' असं लोक म्हणतात. मला वाटतं, आजकाल पैशांची किंमत स्वस्त झाली आहे," असंही त्यांनी सांगितलं होतं. 

फोर्बच्या माहितीनुसार, 'डिस्को डान्सर' सिनेमाची १२० मिलियनहून अधिक तिकिटे विकली गेली होती. १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणारा 'डिस्को डान्सर' हा पहिला भारतीय सिनेमा ठरला होता. केवळ भारतातच नव्हे तर रशिया, चीन, तुर्की, युरोप, आफ्रिका याठिकाणी मिथुनदाच्या 'डिस्को डान्सर'ला लोकप्रियता मिळाली होती. मिथुन चक्रवर्तींबरोबर या सिनेमात कल्पना अय्यर, राजेश खन्ना, ओम पुरी अशी कलाकारांची फौज होती. बब्बर सुभाष यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. 

टॅग्स :मिथुन चक्रवर्तीसेलिब्रिटीसिनेमा