Join us  

'आमची ज्योती हरवली..'; 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींनी सांगितली बहिणीची भावूक आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:57 PM

आई कुठे काय करते मधील अभिनेते मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर खास पोस्ट करत त्यांच्या आयुष्यातील विशेष आठवण सांगितली आहे (milind gawali, aai kuthe kay karte)

मिलिंद गवळी त्यांच्या आयुष्याबद्दलचे विविध अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असतात. मिलिंद यांनी नुकतीच सोशल मीडियावर त्यांची मावसबहिण ज्योतीची खास आठवण शेअर केलीय. मिलिंद गवळींनी बहिण ज्योतीच्या लेकीच्या लग्नाचा खास व्हिडीओ शेअर करत लिहिलंय की, “ज्योतीच्या लेकीचं लग्न”. परवा नाशिकला शिवानी च्या लग्नाला गेलो होतो, शिवानी म्हणजे माझ्या मावसबहिण ज्योतीची मुलगी, अगदी खूप खूप वर्षांनी ज्योती मला भेटली, त्या लग्नाच्या गर्दीमध्ये सगळ्या गोंधळामध्ये तिने मला पाहिलं आणि येऊन घट्ट मिठी मारली."

मिलिंद गवळी पुढे लिहितात, "तिथे मला आमच्या लहानपणीचा एक फार मजेदार किस्सा आठवला, आमच्या लहानपणी म्हणजे ज्या काळामध्ये मोबाईलच नव्हते मल्टिप्लेक्स नव्हते मॉलस नव्हते, त्या काळामध्ये डबल डेकर बसेस असायचे, आम्हा मुलांना वरती जाऊन बसायला खूप आवडायचं,त्यावेळेला आमच्या फिरायच्या जागा म्हणजे राणीचा बाग किंवा म्हातारीचा बूट,हँगिंग गार्डन, किंवा गिरगाव चौपाटी, आमच्या घरी नाशिक वरून पाहुणे आले की आम्ही अशा एका ठिकाणी फिरायला जायचं, एके दिवशी आम्ही सगळेच जवळ जवळ 12-15 लोक फिरायला गेलो होतो दिवसभर भटकलो, खाल्लं आणि रात्री दहा साडेदहा वाजता डबल डेकर बस मधून आम्ही सगळे डिलाईन रोडला परत आलो, सगळे हसत खेळत गप्पा मारत घरी चालत येत असताना एकाच्या लक्षात आलं की अरे ज्योती कुठे काही दिसत नाहीये, नंतर सगळ्यांना धक्का बसला की ज्योती त्या डबल डेकर बस मध्येच राहून गेली होती आणि बस निघून गेली होती, कोणाच्याच लक्षात नाही आलं बहुतेक तिला झोप लागून गेली होती आणि ती उतरायची विसरली,आम्ही मुलांनी सुद्धा काही तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं त्यामुळे ज्योती हरवली."

मिलिंद गवळी शेवटी लिहितात, "मग काय सगळ्यांची धावपळ सुरू झाली , माझे वडील या पोलीस स्टेशनला जा त्या पोलीस स्टेशनला जा चौकशी कर, एक लहान मुलगी तीन-चार वर्षाची ती हरवली, ताई मावशी आणि माझी आई रडायला लागल्या गोंधळच गोंधळ उडाला, आणि रात्री साडे अकरा बारा वाजता, माझे वडील ज्योतीला परत घरी घेऊन आले, एका सज्जन गृहस्थाने हरवलेल्या ज्योतीला भायखळा पोलीस ठाण्यात आणून सोडलं होतं.ज्योतीला बघून आम्ही सगळ्यांनी तिला घट्ट मिठी मारली, आम्हाला वाटलं होतं "अमर अकबर अँथनी" सारखं भावा बहिणीची ताटातूट झाली की काय,ज्योती घरी आल्यानंतर सगळ्यांच्या जिवात जीव आला, खूप आनंद झाला पण ताई मावशीने तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि चार धपाटे हाणले, ताई मावशीचा सगळ्यात जास्ती मार कोणी खाल्ला असेल तर तो ज्योतीनेच खाल्ला होता. आज शिवानी च्या लग्नामध्ये ज्योतीची नवरीची आई म्हणून धावपळ बघत होतो , लेकीकडे आनंदाने बघत, अर्ध्या पाणवल्या डोळ्यांनी सगळ्यांची विचारपूस करत होती, एका matured बाईसारखी , पण मला मात्र ती तीच ज्योत्या दिसत होती , लहानशी,अल्लड, खूप बडबड बडबड करणारी."

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिका