ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 'झापुक झुपूक' सिनेमातून सूरज मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सूरज आणि 'झापुक झुपूक'च्या टीमने लोकमत फिल्मीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत सिनेमाचे किस्से सांगताना सूरजने त्याच्या आईवडिलांविषयीदेखील भाष्य केलं.
आईवडिलांबद्दल बोलताना सूरज भावुक झाल्याचं दिसलं. तो म्हणाला, "माझे वडील दारू प्यायचे, गांजा ओढायचे. त्याच्यामुळे त्यांना गाठ आली. नाहीतर त्यांना त्रास झालाच नसता. त्यांनी ऐकलं नाही. ससूनमध्ये त्यांना घेऊन गेलो होतो. तिकडेही ते लाल पान खाऊन आले. त्यांच्या खिशात दारूची बाटली होती. त्यांना आत्या आणि आजी सांगायचे. दारू नको पिऊस...तुला एक मुलगा आहे. ५ मुली आहेत. त्यांना कोण सांभाळणार? पण त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे माझ्या आईला वेड लागलं. आईने टेन्शन घेतलं की आता काय करायचं...पण, त्यांचे आशीर्वाद आहेत. म्हणून मी इथे आहे".
केदार शिंदेंनी 'बिग बॉस मराठी ५'च्या ग्रँड फिनालेला 'झापुक झुपूक' सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमात तेव्हाच सूरजची हिरो म्हणून एन्ट्री झाली. केदार शिंदेंनीच या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात सूरजसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकार झळकले आहेत.