Join us

आदित्य, बबली आणि सनीचं ५ कोटी मिळवायचं स्वप्न होणार का पूर्ण? ‘येरे येरे पैसा ३’चा धमाल ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 11:16 IST

‘येरे येरे पैसा ३’ सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांनी या ट्रेलरला चांगला प्रतिसाद दिला आहे

‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच पार पडला. विशेष म्हणजे या सोहळ्याला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी उपस्थित होते. या दोन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’चा ट्रेलर लाँच झाला. आता नुकताच सोशल मीडियावर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

‘येरे येरे पैसा ३’चा ट्रेलर

ट्रेलरमध्ये सुरुवातीला सर्वजण ५ करोड रुपयांची स्वप्नं बघत असतात. पुन्हा एकदा आदित्य, बबली आणि सनी हे पैशांच्या मागे पळताना दिसतात. या तिघांसोबत अण्णा आणि त्याची गँग धमाल करताना दिसते. सर्वजण कोट्याधीश होण्याची स्वप्न रंगवत असतात. मग पुढे या तिघांची स्वप्न पूर्ण होतात का? हे तिघे कोणाच्या जाळ्यात अडकतात? याची छोटीशी झलक  ‘येरे येरे पैसा ३’च्या ट्रेलरमध्ये दिसतेय. २ मिनिटं २१ सेकंदाचा हा ट्रेलर धमाल आहे आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आहे.

कधी रिलीज होणार ‘येरे येरे पैसा ३’?

धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे चित्रपटाचे निर्माते असून सौरभ लालवाणी सहनिर्माते आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. कलाकारांच्या चमकदार यादीत संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत. ‘येरे येरे पैसा ३’ हा सिनेमा १८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :सिद्धार्थ जाधवउमेश कामततेजस्विनी पंडितसंजय जाधवराज ठाकरेसंजय नार्वेकरये रे ये रे पैसा २