Join us
Daily Top 2Weekly Top 5

'वास्तव' फेम ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 12:44 IST

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सुनील शेंडे (Suni Shende) यांचे निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सुनील शेंडे (Suni Shende) यांचे निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते. विले पार्ले पूर्वेकडील राहत्या घरी उशीरा रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी  त्यांचे अंत्यविधी होणार आहेत. पारशीवाडा येथील हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुलं ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. 

अभिनेते सुनील शेंडे घरातच चक्कर येऊन पडले. यामुळे त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांची सून जुईली शेंडे यांनी दिली आहे. त्यांनी रात्री १ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटविली होती. त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खडा आवाज यामुळे पोलीस, राजकारणी अशा विविध भूमिकांतून त्यांनी रसिकांच्या मनात घर केले आहे.

सुनील शेंडे यांच्या सरफरोश, गांधी, वास्तव या चित्रपटांमधील भूमिका लोकप्रिय झाल्या होत्या. चित्रपटांमध्ये ते सहाय्यक भूमिकांमध्ये पाहायला मिळाले असले तरी त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. निवडुंग, मधुचंद्राची रात्र, जसा बाप तशी पोर, ईश्वर, नरसिम्हासह अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.  मागील काही काळापासून ते लाइमलाइटपासून दूर होते.