उर्मिला कोठारे झळकणार हिंदी वेबसीरीजमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 11:05 IST
नाटक, मालिका, चित्रपटानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत वेबसीरीजची क्रेझ निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहेत. या वेबसीरीजमध्ये प्रेक्षकांचे लाडके कलाकार ...
उर्मिला कोठारे झळकणार हिंदी वेबसीरीजमध्ये
नाटक, मालिका, चित्रपटानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत वेबसीरीजची क्रेझ निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहेत. या वेबसीरीजमध्ये प्रेक्षकांचे लाडके कलाकार मोठया प्रमाणात दिसत आहेत. आता हेच पाहा ना, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, गौरी नलावडे, सई ताम्हणकर, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके यांच्यापाठोपाठ आता, अभिनेत्री उर्मिला कोठारेदेखील वेबसीरीजमध्ये पाहायला मिळणार असल्याचे कळत आहे. मात्र तिची ही वेबसीरीज हिंदी असणार आहे. तिच्यासोबत या वेबसीरीजमध्ये बॉलिवुडचा तगडा कलाकार आर माधवनदेखील झळकणार आहे. ही तिची पहिलीच वेबसीरीज असणार आहे. या वेबसीरीजचे नाव ब्रीद आहे असे कळते. या वेबसीरीजमध्ये आणखी काही मराठी चेहरेदेखील असण्याची शक्यता आहे. या अभिनेत्रीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तिने आतापर्यत मराठी चित्रपटसृष्टीला एक से एक चित्रपट दिले आहेत. यामध्ये शुभमंगल सावधान, आई शपथ, प्यारवाली लव्ह स्टोरी, मला आई व्हायचयं, टाइमपास, गुरू, ती सध्या काय करते अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. त्याचबरोबर तिने असंभव, गोष्ट एका लग्नाची, वेग अशा मालिकेतूनदेखील तिने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. तसेच ती मायका, मेरा ससुराल या हिंदी मालिकेतदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली. आता उर्मिला ही लवकरच तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्या भूमिकेत झळकणार आहे. अलौकिक जीवन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या आयुष्यावर बेतलेला विठा हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर येतोय. या चित्रपटाची निर्मिती नम्रता एन्टरटेण्मेंट प्रा. लि. या चित्रपट निर्मिती संस्थेने आपला पिक्चर या निर्मिती संस्थेच्या सहयोगाने केली आहे. नुकतेच विठा चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत उपेंद्र लिमये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत