मराठीतली प्रेक्षकांची लाडकी जोडी उमेश कामत (Umesh Kamat) आणि प्रिया बापट (Pirya Bapat) १२ वर्षांनी स्क्रीनवर एकत्र येत आहेत. त्यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमा १२ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. कालच सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी प्रिया-उमेश या रिअल लाईफ कपलने त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील गंमती जमती सांगितल्या. तसंच मराठी सिनेमात एकत्र येण्यासाठी १२ वर्ष का लागली? याचंही उत्तर त्यांनी दिलं.
प्रिया बापट आणि उमेश कामत ही ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनही सर्वांची आवडती जोडी आहे. जवळपास १२ वर्षांनंतर ते एका मराठी सिनेमात एकत्र दिसणार आहेत. स्क्रीनवर एकत्र यायला एवढा वेळ का लागला? यावर उमेश म्हणाला, "१२ वर्षांपूर्वी आम्ही खूप एकत्र काम करत होतो. एक टेलिव्हिजन शो करत होतो. नवा गडी नवं राज्य नाटकही सुरु होतं. त्यावरच टाईम प्लीज हा सिनेमाही केला. मग आम्ही ठरवलं की आता एकत्र काम करणं जरा थांबवूया. नाहीतर आपल्यावर शिक्का बसेल की प्रियाला कास्ट केलं की उमेशला घ्यावंच लागतं किंवा उमेशला घेतलं तर प्रियाला कास्ट करावंच लागतं. हे व्हायला नको म्हणून आम्ही ठरवून वेगवेगळं काम करायला लागलो. नंतर ३-४ वर्षांनी वाटलं की आता चला, आता पुन्हा एकत्र काम करुया. पण मग मनासारखं, छान काही मिळत नव्हतं. किंवा आमचे लोक बहुतेक आम्हाला विसरले होते. आता सुदैवाने ही चांगली स्क्रिप्ट आली आणि आम्ही पुन्हा एकत्र आलो."
मला मराठी सिनेमाची ऑफरच आली नाही
प्रिया बापट सध्या हिंदीत जास्त काम करताना दिसत आहे. तिचा हिंदीत भाव वाढल्याने आता मराठी निर्मात्यांना तिच्या बजेटचं टेन्शन आलं असावं अशी थट्टा पुष्कर श्रोत्रीने ट्रेलर लाँचवेळी केली. तेव्हा प्रिया म्हणाली, "असं अजिबातच नाही. मी हिंदीचं बजेट इथे सांगितलेलं नाही. सिनेमाच्या निर्मात्यांना विचारा. मी 'आम्ही दोघी'हा शेवटचा सिनेमा मराठीत केला. त्यानंतर हिंदीत काम करत होते. मी आधीही बोलले आहे की मला त्यानंतर कोणीही मराठी सिनेमा विचारलाच नाही. ही वस्तुस्थिती आहे. मला हिंदीत काम मिळत गेलं आणि मी करत गेले. नंतर आदित्य एवढी छान स्क्रिप्ट घेऊन आमच्याकडे आला आणि आम्ही दोघांनी हा सिनेमा एकत्र करण्याचं ठरवलं."